भिवंडी : भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात झालेल्या दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करीत दोन आरोपींना जेरबंद करण्यात भिवंडी तालुका पोलिसांना यश मिळाले आहे. हिरा रामप्रसाद गौड (वय २६) व मोहम्मद हैदर मोह. हुसेन शेख (वय २७) दोघे रा. भिवंडी मूळ रा.उत्तर प्रदेश अशी अटक आरोपींची नावे आहेत.
भिवंडी तालुक्यातील खारबाव येथे रुपेश कृष्णा पाटील यांच्या घरात झालेल्या घरफोडीत ५७ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेली होती, तर दुसऱ्या घटनेत नंगराज विराजी पटेल यांच्या गोदामात घरफोडीची घटना घडली होती. या बाबत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात घरफोडी चे दोन गुन्हे दाखल होते.
पोलीस उपअधीक्षक अजित आगरकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व पोलीस पथकातील संजय कोळी, कुणाल भामरे, के डी काळढोके, जयवंत मोरे, सुशील पवार, दामोदर पवार, समिन्ध गोखले या कर्मचाऱ्यांनी गुन्ह्यांच्या परिसरातील सीसीटीव्ही व मोबाईल तांत्रिक तपासाच्या आधारे माहिती काढली.
या माहितीच्या आधारे हिरा रामप्रसाद गौड व मोहम्मद हैदर मोह.हुसेन शेख या दोघांच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातून गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या ट्रक सह दोन्ही गुन्ह्यात एकूण २ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी गुरुवारी दिली आहे.