अबुधाबी - ३० वर्षीय सूर्यकुमार यादवला अद्यापही भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. सातत्याने चांगली कामगिरी करूनही निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे मत अनेक दिग्गजांनी व्यक्त केले आहे. यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वन-डे संघात सूर्यकुमारला संधी मिळेल असे वाटत होते, मात्र त्याच्या पदरी निराशाच आली. आरसीबीविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात ७९ धावांची नाबाद खेळी करत सूर्यकुमारने मुंबईला पाच गडी राखून विजय मिळवून दिला. त्याची अर्धशतकी खेळी, निवड समितीसाठी चपराक समजली जाते.मुंबईचा काळजीवाहू कर्णधार किरोन पोलार्ड याने सूर्यकुमार भारतीय संघात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. तो म्हणाला, ‘भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे सूर्यकुमार यादव नक्कीच दु:खी असेल. देशांतर्गत, आयपीएल आणि भारतीय अ संघाकडून शानदार प्रदर्शन केल्यानंतरही सूर्यकुमारची भारतीय संघात निवड झाली नाही. सूर्यकुमार मुंबई इंडियन्ससाठी सातत्याने धावा काढत आहे. त्याची भारतीय संघात निवड होईल. आम्ही सुरुवातीला काही विकेट लवकर गमावल्या. पण सूर्यकुमार यादवने विजय मिळवून दिला. तुम्ही सतत चांगला खेळ करीत असाल तर बक्षीस मिळायला हवे. तरीही सूर्यकुमारची भारतीय संघात निवड झाली नाही याबाबत तो दु:खी असेल.’सूर्यकुमार यादवने आयपीएलच्या १३ व्या सत्रात १२ सामन्यात ४०.२२ च्या सरासरीने ३६२ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सलामीवीर क्विंटन डिकॉकनंतर दुसऱ्या स्थानी आहे.
सूर्य नमस्कार, भक्कम रहा, संयम राख! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात मुंबईच्या सूर्यकुमार यादवला स्थान न मिळाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खूप वाद सुरू आहे. संघाची निवड झाल्यानंतर सूर्यकुमारने आरसीबीविरुद्ध नाबाद अर्धशतकी खेळी करून मी दावेदार होतो, हे सिद्ध केले. चाहते विराट आणि बीसीसीआयवर नाराज आहेत. कालची सूर्यकुमारची खेळी पाहिल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूर्यकुमारचे कौतुक करत त्याला संयम ठेवण्याचा सल्ला दिला. सामन्यानंतर शास्त्री यांनी ट्विट करीत, ‘सूर्य नमस्कार, भक्कम रहा, संयम राख!’ असा सल्ला दिला. सूर्यानेदेखील ड्रेसिंग रूमकडे परतताना माझ्यावर भरवसा ठेवा, मी विजय खेचून आणू शकतो,’ असे संकेत दिले. वीरेंद्र सेहवाग ट्विट करताना म्हणाला, ‘बंदे मे है दम, इसमे कोई शक नहीं की जल्द ही नंबर आयेगा. माजी निवड समिती प्रमुख कृष्णम्माचारी श्रीकांत म्हणाले, ‘भारतीय संघात निवडीसाठी त्याला काय करावे लागेल, माहिती नाही. लवकरच तो राष्ट्रीय संघात दिसेल,अशी अपेक्षा बाळगूया.’ सचिनने लिहिले, ‘नेहमी धीरगंभीर, मुंबईचा शानदार विजय. अद्याप बरेच काही मिळवायचे आहे.’