Pollard, IND vs WI 1st T20 : भारतीय संघाने धडाकेबाज वेस्ट इंडिजला पहिल्या टी२० सामन्यात ६ गडी राखून पराभूत केले. वेस्ट इंडिजच्या संघाकडून निकोलस पूरनने दमदार अर्धशतक ठोकलं होतं. त्याच जोरावर त्यांनी १५७ धावांपर्यंत मजल मारली होती. पण भारतीय फलंदाजांच्या प्रयत्नांपुढे हे आव्हान तोकडे पडले. टीम इंडियाने ७ चेंडू राखून वेस्ट इंडिजवर विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माने दमदार ४० धावा केल्या. तर सूर्यकुमारने नाबाद ३४ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या पराभवानंतर कर्णधार पोलार्डने, संघाची नक्की कुठे चूक झाली, याची कबुली दिली.
"सामना खूप अटीतटीचा झाला. १९व्या षटकापर्यंत सामना रंगला यातच सारं काही आलं. पण अगदी खरं सांगायचं तर आमच्या संघाने ६ ते १५ या मधल्या षटकांमध्ये खूपच कमी धावा केल्या. आम्ही अपेक्षेपेक्षा १५-२० धावा कमी केल्या. गोलंदाजीमध्ये झटपट बळी घेऊन प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणता येऊ शकते. पण रोहित शर्माने संघाला वेगवान सुरूवात मिळवून दिली. त्यामुळे आम्हाला आमच्या कामगिरीत सुधारणा करणं गरजेचं आहे", अशी स्पष्ट भूमिका पोलार्डने मांडली.
"फलंदाजी करताना डॉट बॉलची संख्या कमी करणं हे आमच्या पुढचे आव्हान असणार आहे. फटकेबाजी करताना ९० धावांवर सगळा संघ गारद झाला तर गोष्ट वेगळी आहे. पण मधल्या ९ षटकात आम्ही फक्त ४६ धावाच करू शकलो. जर त्यावेळी आम्ही १५-२० धावा जास्त केल्या असत्या तर आम्ही नक्कीच भारतीय संघाला रोखू शकलो असतो. सामन्याचा मूड नीट सेट करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यानुसार मग सामना एखाद्या संघाच्या दिशेने प्रवाहित व्हायला सुरूवात होते. अजून वर्ल्ड कपला वेळ असल्याने फारशी चिंता करण्याचं कारण नाही. पण हळूहळू योजनांची अंमलबजावणी केली जायला हवी यात शंका नाही. कदाचित पुढच्याच सामन्यात आम्ही आखलेल्या योजना नीट अमलात आणून आम्ही सामना जिंकूही शकतो", असा विश्वास पोलार्डने संघातील सहकाऱ्यांबाबत व्यक्त केला.