Join us  

Pollard, IND vs WI 3rd T20 : "आमची हीच मोठी चूक झाली"; कर्णधार पोलार्ड लाजिरवाण्या पराभवानंतर झाला हवालदिल

भारताने तिसरी टी२० जिंकत वेस्ट इंडिजला दिला 'व्हाईटवॉश'; पोलार्डच्या नेतृत्वाखालील संघाने वन डे पाठोपाठ टी२० मालिकाही गमावली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 1:05 PM

Open in App

Pollard, IND vs WI 3rd T20 : भारतीय संघाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजविरूद्ध तिसरी टी२० जिंकत मालिका ३-०ने खिशात घातली. वन डे पाठोपाठ वेस्ट इंडिजला टी२० मालिकेतही व्हाईटवॉश मिळाला. कायरन पोलार्डच्या संघातील अनेक खेळाडू जगभरातील विविध टी२० स्पर्धांमध्ये खेळतात. त्यामुळे भारताला टी२० मालिकेत वेस्ट इंडिजकडून काँटे की टक्कर मिळेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण तसं पाहायला मिळालं नाही. मालिका संपल्यानंतर, वेस्ट इंडिजचं नक्की काय चुकलं, याबद्दल पोलार्डने मत व्यक्त केलं.

"आमची १५व्या षटकापर्यंत सामन्यावर पकड होती. त्यानंतर सामना हातून निसटला. आमच्या फलंदाजांनी पहिल्या ८ षटकात ७०-८० धावा करत दमदार सुरूवात करून दिली होती. पण त्यानंतर ती लय पुढे कायम ठेवण्यात आम्ही अपयशी ठरलो. या टी२० मालिकेत निकोलस पूरनने दमदार कामगिरी करत तीन अर्धशतके ठोकली. त्याचं कौतुक केलंच पाहिजे. रॉवमन पॉवेलनेदेखील फटकेबाजी करत संघातील आपली दावेदारी निश्चित केली", असं पोलार्ड म्हणाला.

आमची हीच चूक झाली!

"एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे भारतात येऊन क्रिकेट खेळणं हे नेहमीच कसोटीचं असतं. वन डे आणि टी२० असे दोन्ही सामने जिंकण्याची आमच्याकडे संधी होती. पण आम्हालाच ते शक्य झालं नाही. आम्ही नक्की चूक कुठे झाली याबद्दल बोलायचं तर टी२० क्रिकेटचा आमच्या संघाला आणि खेळाडूंना प्रचंड अनुभव आहे. पण आम्हाला एक संघ म्हणून सामने किंवा मालिका जिंकता आली नाही हीच आमची मोठी चूक झाली", अशी प्रामाणिक कबुली कायरन पोलार्डने दिली.

"आता टी२० वर्ल्ड कप आठ महिन्यांवर आला असताना आमच्या खेळाडूंवर दडपण आहे. पण आम्ही जितके जास्त सामने खेळू तितकी आमची कामगिरी सुधारत राहिल", असा विश्वासही पोलार्डने व्यक्त केला.

दरम्यान, भारतीय संघाने तिसऱ्या टी२० सामन्यात प्रथम फलंदाजी करत १८४ धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने ७ षटकार आणि एक चौकार खेचत ६५ धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने त्याला उत्तम साथ देत १९ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला १६७ धावाच करता आल्या. निकोलस पूरनने झुंजार खेळ करत मालिकेतील सलग तिसरं अर्धशतक (६१) ठोकलं. रोमारियो शेपर्ड (२९) आणि रॉवमन पॉवेल (२५) या दोघांनीही फटकेबाजी प्रयत्न केला. पण अखेर भारताने १७ धावांनी सामना जिंकला.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजकिरॉन पोलार्डसूर्यकुमार अशोक यादवरोहित शर्मा
Open in App