नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेल्या किएरॉन पोलार्ड याने सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर आपल्या वडिलांना नमन केले. पोलार्डच्या वडिलांचे मार्च महिन्यात आयपीएलच्या आधी निधन झाले होते. त्यावेळी त्याने सोशल मिडियावर पोस्ट देखील केली होती. आता शनिवारी झालेल्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केल्यावर तो आकाशाकडे पाहत हात जोडून उभा राहिला. आणि वडिलांना नमन केले. त्यावेळी मुंबई इंडियन्सचा प्रत्येक चाहता देखील हळवा झाला होता.
शनिवारच्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर अंबाती रायुडूच्या तुफानी खेळीच्या जोरावर चेन्नईने २१९ धावांचे लक्ष ठेवले होते. हे अशक्यप्राय वाटणारे लक्ष मिस्टर आयपीएल किएरॉन पोलार्डने आपल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर सहज पुर्ण केले. पोलार्डने ३८ चेंडूतच ८७ धावा कुटल्या. त्याने ८ उत्तुंग षटकार लगावले. मुंबईला अखेरच्या चेंडूवर दोन धावा काढुन देत त्याने विजय मिळवुन दिला. मात्र त्यानंतर विजयाचा आनंद अपेक्षीत असतांनाच पोलार्ड हळवा झाला. त्यासमोर वडिलांच्या आठवणी जाग्या झाल्या. त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. त्याने आभाळाकडे पाहून हात जोडले. त्यावेळी त्याच्यासह मुंबईचा संपुर्ण संघच भावुक झाला होता. कर्णधार रोहित शर्मा याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. तर संघ सहकारी हार्दिक पांड्या हा देखील त्यावेळी पोलार्डजवळ पोहचला.
पोलार्ड ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम - पांड्यापोलार्ड याची पांड्या बंधुंसोबत चांगलीच गट्टी आहे. पोलार्डच्या तुफानी खेळीनंतर पांड्या बंधुंनी सांगितले की,‘ तो आमच्यासाठी ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ खेळाडू आहे.. कृणाल म्हणाला की, जे पोलार्डने केले ते फक्त काही मोजक्या लोकांनाच जमले आहे. मात्र त्याने या आधी देखील अनेकवेळा अशी कामगिरी केली आहे.