क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम होतात अन् ठराविक काळाने मागेही पडतात. इथं विक्रम सेट होतो तो मोडण्यासाठीच असंही म्हटलं जाते. पण काही रेकॉर्ड्स असे असतात, जे मोडण्याची कल्पनाच करता येत नाही. वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन याने असाच एक विक्रम सेट केलाय. त्याचा हा रेकॉर्ड कुणी मायकालाल भविष्यात मोडेल, असं वाटत नाही. आता त्याने कोणत्या फॉर्मेटमध्ये नेमका कोणता 'महा रेकॉर्ड' केलाय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. इथं आपण त्याच्या या रेकॉर्डबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात
निकोलस पूरनची कमाल, टी-२० क्रिकेटमध्ये गाठला सर्वाधिक षटकारांचा मोठा पल्ला
निकोलस पूरन याने काही दिवसांपूर्वीट टी-२० क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा नवा रेकॉर्ड सेट केला होता. आता त्याने २०२४ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये १५० षटकार मारण्याचा टप्पा गाठलाय. हे वर्ष संपायला आणखी तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे त्याचा हा आकडा दोनशेपार सहज होईल, असे वाटते. सध्या तो ज्या आकड्यापर्यंत पोहचलाय तो आकडा गाठणंही साधी सोपी गोष्ट नाही.
आधी गेलचा होता जलवा, आता निकोलसची हवा
निकोलस पूरन आधी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा ख्रिस गेलच्या नावे होता. वेस्ट इंडीजच्या या क्रिकेटरनं २०१५ या कॅलेंडर ईयरमध्ये १३५ षटकार मारले होते. गेलचा हा रेकॉर्ड तब्बल ९ वर्षे अबाधित होता. जो निकोल पूरननं मोडीत काढला.
CPL मध्ये धमाका; आतापर्यंत कुणाला जमलं नाही ते करुन दाखवलं
कॅरेबियन प्रीमिअर लीग (CPL) २०२४ च्या हंगामात २२ सप्टेंबरला रंगलेल्या ट्रिनबागो नाइट रायडर्स विरुद्ध सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियॉट्स यांच्यातील सामन्यात पूरन याच्या भात्यातून तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. नाइट रायडर्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या पूरन याने ४३ चेंडूत ९३ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या या खेळीत ७ षटकारांचा समावेश होता. यासह त्याने टी -२० क्रिकेटमध्ये एका वर्षात १५० षटकार मारण्याचा मैलाचा पल्ला गाठला. याआधी अशी कामगिरी कुणालाही करता आलेली नाही.