मुंबई : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी कळवले आहे. या कालावधीमध्ये कोहली सरे या कौंटी संघातून काही सामने खेळणार आहे. त्यामुळे रहाणेकडे भारताच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. मंगळवारी भारतीय निवड समितीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये रहाणेच्या कर्णधारपदावर शिक्कामोर्तब होणार आहे. अजिंक्यने यापूर्वीही भारतीय संघाची कमान सांभाळली होती.
भारतीय ' अ ' संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून या संघाचे कर्णधारपद दिनेश कार्तिककडे सोपवले जाऊ शकते. भारतीय ' अ ' संघ यजमान इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या देशांच्या ' अ ' संघाबरोबर तिरंगी मालिका खेळणार आहे. या संघात मुरली कार्तिक आणि लोकेश राहुल हे सलामीला येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आर. अश्विन आणि कृणाल पंड्या या फिरकीपटूंनाही संधी स्थान मिळण्याची शक्यता आहे.
चेतेश्वर पुजारा सध्याच्या घडीला यॉर्कशायर या संघाकडून कौंटी क्रिकेट खेळत आहे. पण अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले आहे.
आयपीएलपूर्वी श्रीलंकेत झालेल्या निदाहास ट्रॉफीमध्ये कार्तिकने दमदार कामगिरी केली होती. अंतिम फेरीत अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत त्याने संघाला जेतेपद मिळवून दिले होते. त्याचबरोबर सध्या तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे त्याच्याकडे भारतीय ' अ ' संघाची धुरा सोपवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.