Join us  

डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी ‘सॉफ्ट सिग्नल’ नियम बदलण्याची शक्यता

विराट कोहलीने उपस्थित केले होते प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 7:04 AM

Open in App

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ‘सॉफ्ट सिग्नल’ नियम बदलण्याच्या विचारात आहे. अलीकडे मैदानी पंचांच्या सॉफ्ट सिग्नल निर्णयावर वारंवार वाद झाल्याचे लक्षात येताच आयसीसीने यात बदल करण्यास पुढाकार घेतल्याचे दिसते.

सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गुरुवारी झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित केल्याची माहिती आहे. या प्रश्नावर त्यांना अन्य सदस्य देशांचादेखील पाठिंबा लाभला. मैदानी पंचांनी ‘सॉफ्ट सिग्नल आऊट’ देण्याच्या नियमात बदल होणे काळाची गरज असल्याचे अनेक सदस्य देशांचे मत होते.

भारत आणि इंग्लंड दरम्यान अहमदाबाद येथे झालेल्या चौथ्या टी-२०त पंचांच्या सॉफ्ट सिग्नल निर्णयावर बराच वाद झाला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम कुरेन याच्या चेंडूवर डेव्हिड मलानने फाईन लेगवर सूर्यकुमार यादवचा झेल टिपला. झेल घेण्याआधी चेंडू जमिनीला लागल्याचे रिप्लेत स्पष्ट दिसत होते. मैदानी पंचाने हे प्रकरण तिसऱ्या पंचाकडे सोपविण्याआधीच सॉफ्ट सिग्नलच्या रुपाने सूर्यकुमारला बाद दिले. तिसऱ्या पंचाने देखील नाबादचे ठोस पुरावे नसल्याचे कारण देत मैदानी पंचाचा निर्णय योग्य ठरविला होता.

चौथ्या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली याने या मुद्दयावर प्रश्न उपस्थित केला होता. विराटचे मत असे होते की, ‘शंकास्पद स्थितीत मैदानी पंचाने सॉफ्ट सिग्नलऐवजी, ‘मला माहिती नाही’ असा कॉल द्यायला हवा होता. असे निर्णय सामन्याचा निकाल फिरवू शकतात. मोठ्या सामन्यात तर काहीही घडू शकते. आज आम्हाला फटका बसला, उद्या आमच्या जागी अन्य कुठला तरी संघ असेल.’ डेव्हिड मलानने झेल टिपला त्यावेळी सूर्यकुमार खेळपट्टीवर स्थिरावला होता. तो सॉफ्ट सिग्नलचा बळी ठरला. त्यामुळे ठोस पुराव्याअभावी तिसरे पंच निर्णय बदलू शकले नाहीत. 

‘अम्पायर्स कॉल’ राहणार कायममेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी)अलीकडे सॉफ्ट सिग्नल नियमात बदलाची शिफारस केली होती. एमसीसीच्या विश्व क्रिकेट समितीने दिलेल्या शिफारसीनुसार, मैदानी पंचांनी शंकास्पद झेलप्रकरणी बाद किंवा नाबाद ठरविण्याऐवजी ‘अनसोल्ड’संबोधावे. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वात ॲन्ड्रयू स्ट्रॉस, राहुल द्रविड, माहेला जयवर्धने आणि शॉन पोलाक यांच्यासारख्या माजी दिग्गजांनी, मॅचरेफ्री रंजन मदुगुले, पंच रिचर्ड इलिंगवर्थ आणि मिकी आर्थर यांचा समावेश असलेल्या क्रिकेट समितीने अन्य सामनाधिकारी, प्रसारक, बॉल ट्रेकिंग आयटी कंपनी ‘हॉक आय’ यांच्याकडून यासंदर्भात सूचना मागितल्या. यानंतर सर्व संमतीने निर्णय घेतला की, अम्पायर्स कॉलचा नियम कायम असायला हवा. बॉल ट्रेकिंग तंत्र शंभर टक्के योग्य असूच शकत नाही, असा या समितीचा निष्कर्ष होता.

जूनपूर्वी बदल अपेक्षित‘सॉफ्ट सिग्नल’नियमामध्ये बदल करण्यासाठी तो थेट क्रिकेट समितीला पाठविता येत नाही. हा नियम आता आयसीसी सीईओकडे पाठविण्यात येत आहे. नंतर आयसीसी बोर्डात त्यावर चर्चा केली जाईल. ही प्रक्रिया थोडी वेळकाढू आहे. तथापि, बीसीसीआयने जूनमध्ये होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी नियमात बदल होईल, असा विश्वास व्यक्त केला. अम्पायर कॉलचा नियम मात्र कायम असेल. आयसीसी बोर्डाची पुढील बैठक ३१ मार्च आणि एक एप्रिल रोजी अपेक्षित आहे.

टॅग्स :विराट कोहली