नवी मुंबई : यंदाचा विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार असून निश्चितच यजमान देश म्हणून इंग्लंडला त्याचा फायदा होईल. तसेच गेल्या दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये यजमान देशानेच चषक पटकावल्याने, यंदाही यजमानच बाजी मारेल,’ असे मत भारताचे माजी दिग्गज फलंदाज लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. खारघर येथे एका कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या गावसकर यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेविषयी त्यांनी म्हटले की, ‘२०१५ साली ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा संघ साखळी फेरीतच गारद झाला होता. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या खेळात कमालीची सुधारणा केली असून आज आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत ते अव्वल स्थानी आहेत. त्यात यंदाचा विश्वचषक इंग्लंडमध्येच होत असल्याने घरच्या वातावरणाचा फायदा त्यांना होईलच; शिवाय २०११ साली आणि २०१५ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेवर अनुक्रमे भारत आणि ऑस्ट्रेलिया या यजमानांनीची वर्चस्व राखले असल्याने यंदा इंग्लंडच जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसते,’ असेही गावसकर यांनी या वेळी स्पष्ट केले.
विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी महेंद्रसिंग धोनीची कामगिरी निर्णायक राहील, असे सांगताना गावसकर म्हणाले की, ‘धोनीकडे प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्याने संघाचे नेतृत्व केलेले आहे. धोनी सामन्याची परिस्थिती पटकन ओळखतो. यानुसार तो पटकन योजना बनवतो आणि त्यात यशस्वीही ठरतो.’ त्याचप्रमाणे, ‘संघाचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले, तर धोनी पुढची स्थिती सांभाळू शकतो,’ असेही गावसकर म्हणाले. ‘धोनी यष्ट्यांमागे कमालीची कामगिरी करतो. सध्या क्रिकेटविश्वात त्याच्या तोडीचा यष्टीरक्षक कोणीही नाही. यष्ट्यांमागून तो गोलंदाजांना अचूक मार्गदर्शनही करतो. त्याचा अनुभव नक्कीच भारतासाठी निर्णायक ठरेल,’ असेही गावसकर यांनी म्हटले.
Web Title: The possibility of England being dominated by the World Cup - Sunil Gavaskar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.