Join us  

दांडियामुळे होऊ शकते ‘दांडी गुल’! १५ ऐवजी १४ ऑक्टोबरला भारत-पाक भिडण्याची शक्यता

क्रिकेट विश्वचषक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 9:12 AM

Open in App

नवी दिल्ली : २०२३ च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादमध्ये १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. परंतु, या सामन्याची तारीख बदलू शकते. नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने हा सामना एक दिवस आधी म्हणजे १४ ऑक्टोबर रोजी होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा आहे.

आयसीसी आणि बीसीसीआयने मागच्या महिन्यात वेळापत्रक जाहीर करीत या महामुकाबल्याचे आयोजन करण्याचा मान नरेंद्र मोदी स्टेडियमला बहाल केला होता. त्यानंतर  विमान प्रवास तसेच हाॅटेल्सच्या खोल्यांचे दर गगनाला भिडले होते. आता सामना एक दिवस अगोदर झाला, तर चाहत्यांच्या अडचणींत आणखी भर पडू शकते. 

बीसीसीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ ऑक्टोबर हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेने हा सामना एक दिवस आधी आयोजित करण्याची सूृचना केली. गुजरातमध्ये या रात्रीपासून प्रत्येक रात्र गरबा नृत्याने साजरा होते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, हा सामना नियोजित वेळेच्या एक दिवस अगोदर १४ ऑक्टोबर रोजी होऊ शकतो. मात्र, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. 

अहमदाबादमध्ये हॉटेल्स आधीच बुक 

या सामन्यासाठी हजारो-लाखो चाहते अहमदाबादला पोहोचणार आहेत. सामन्याचे वेळापत्रक बदलले तर चाहत्यांचे मोठे हाल होऊ शकतात. त्यांनी प्रवासाचे आराखडे आधीच निश्चित केले आहेत.  सामन्यासाठी अहमदाबादमधील जवळपास सर्व हॉटेल्स बुक झाली आहेत. चाहत्यांनीही निवासव्यवस्था म्हणून रूग्णालयात बेडसाठीही संपर्क साधला आहे.

जय शहा यांनी बोलावली बैठक

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सर्व यजमान स्थळांच्या सदस्यांना  शुक्रवारी नवी दिल्ली येथे बैठकीस येण्यास सांगितले आहे. बैठकीत भारत-पाकिस्तान सामन्याबाबत निर्णय घेतला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर  चार साखळी सामने होणार आहेत. १९ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामनाही येथेच होणार आहे. जय शाह म्हणाले, ‘सर्व राज्य संघटनांना पत्र पाठवले आहेत. विविध विषयांवर चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही मुद्यांचा आढावा गरजेचा आहे.  विश्वचषकाचे आयोजन जी शहरे करणार आहेत त्या संघटनांना या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले.’

तिकीट विक्रीबाबत माहिती नाही

    वेळापत्रकात बदल झाल्यास मोठ्या प्रमाणावर हॉटेल बुकिंग रद्द होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेचा सलामीचा सामनाही इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात  ५ ऑक्टोबरला होणार आहे.    स्पर्धेसाठी दोन महिन्यांहून अधिक कालावधी शिल्लक आहे; परंतु अद्याप तिकीट विक्रीचे कोणतेही अपडेट नाही. त्यामुळे चाहत्यांची निराशा वाढली आहे.     भारत-पाकिस्तान सामन्याबाबत अंतिम निर्णय घेतल्यानंतर बीसीसीआय तिकिटांची विक्री सुरू करेल, असे मानले जात आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्डपाकिस्तान
Open in App