लंडन: वर्णद्वेष आणि धार्मिक भेदभाव याविषयी ट्विट केल्यामुळे अनेक खेळाडू वादात अडकताच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड(ईसीबी)ने सर्व खेळाडूंच्या सोशल मीडियाची समीक्षा करण्याचा मोठा निर्णय घेतला.जे खेळाडू आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी दोषी आढळतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत.
ईसीबीने वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन याला २०१२-१३ च्या वर्णद्वेषी आणि धार्मिक ट्विटबद्दल निलंबित केले. मागच्या आठवड्यात न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत त्याने पदार्पण केले, मात्र सामना अनिर्णीत संपताच तो संघाबाहेर झाला. रॉबिन्सनच्या ट्विटमुळे वर्णद्वेषाबाबत पुन्हा चर्चेला तोंड फुटले. ईसीबी दुसऱ्या एका खेळाडूच्या वादग्रस्त ट्विटचा तपास करीत असून तोपर्यंत खेळाडू निलंबित राहील.
ईसीबीच्या वक्तव्यानुसार काही जुनी प्रकरणे निकाली निघावीत यासाठी खेळाडूंच्या सोशल मीडियाची समीक्षा करण्याचा बोर्डाने निर्णय घेतला. खेळाडूंना पुढील वैयक्तिक जबाबदारी सांगितली जाईल.
यामुळे योग्य बोध घेण्यास मदत होणार आहे. ईसीबी बोर्डाची बुधवारी बैठक झाली. बैठकीत सोशल मीडियाचा आढावा घेणे आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रशासक, कोच, व्यावसायिक खेळाडू संघटना आदींचा समीक्षा समितीत समावेश असेल. क्रिकेटमध्ये विविधता व सर्वसमावेशकता याविषयी आम्ही कटिबद्ध आहोत. क्रिकेटला सर्वसमावेशक बनविणे हा आमचा मुख्य हेतू आहे. ही प्रतिमा कायम राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. खेळाडूंच्या नेमक्या अपेक्षा त्यांना समजावून सांगायला हवे. जे खेळाडू सामन्यादरम्यान विशिष्ट हावभाव करतात त्यांचाही तपास व्हावा, शिवाय काही आक्षेपार्ह आढळल्यास शिक्षा निश्चित व्हावी.
- इयोन वॉटमोर, ईसीबी प्रमुख
‘सॉफ्ट सिग्नल’चा नियम नकोच - ब्रॉड
अनुभवी इंग्लिश वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने सॉफ्ट सिग्नलचा नियम रद्द करण्याची आयसीसीकडे मागणी केली. या नियमामुळे अधिकारी अडचणीत येतात, शिवाय उद्देशपूर्ती होत नसल्याचे ब्रॉडचे मत आहे. ‘या नियमाचे नकारात्मक पैलू अधिक आहेत. हा खराब नियम आयसीसीने पुढील बैठकीची प्रतीक्षा न करता रद्द करायला हवा,’असे ब्रॉड म्हणाला.
Web Title: Posts on social media of England cricketers will be reviewed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.