नवी दिल्ली । सध्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. श्रीलंकेकडून फिरकीपटू प्रबात जयसूर्याने (Prabath Jayasuriya) ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे प्रबात जयसूर्याने ३१ व्या वर्षी कसोटीमध्ये पदार्पण करून सर्वांचेच लक्ष वेधले. खरं तर चार वर्षांपूर्वी त्याने श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय संघातून वन डे सामने खेळले आहेत. मात्र आता एका मोठ्या कालावधीनंतर त्याचे संघात पुनरागमन झाले आहे, कारण श्रीलंकेच्या संघातील अनेक खेळाडू कोरोना संक्रमित आढळले आहेत.
पदार्पणातच मारला विकेट्सचा षटकारश्रीलंकेच्या संघातील अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे प्रबात जनसूर्याला संघात खेळण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचा फायदा घेत जयसूर्याने कांगारूच्या संघाची कंबर मोडली. जयसूर्याने शानदार गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या ६ फलंदाजांना तंबूत पाठवले, ज्यामध्ये मार्नस लाबुशेन आणि ट्रॅव्हिस हेड यांसारख्या घातक फलंदाजांचा समावेश होता. मात्र स्टीव्ह स्मिथचे वादळ रोखण्यात जयसूर्याला अपयश आले, स्मिथने १४५ धावांची खेळी केली.
प्रबात जयसूर्याने दुसऱ्या कसोटीमध्ये आतापर्यंत ३६ षटके टाकली, ११८ धावांच्या नुकसानात त्याने ६ बळी पटकावले. ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ११० षटकांमध्ये सर्वबाद ३६४ धावांचा डोंगर उभारला. कांगारूच्या संघाकडून स्टीव्ह स्मिथ व्यतिरिक्त मार्नस लाबुशेनने देखील शतकीय खेळी केली. तर श्रीलंकेकडून कसुन रजीथाला २ बळी घेण्यात यश आले. सध्याच्या स्थितीला ऑस्ट्रेलियन संघाची सामन्यावर मजबूत पकड आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे, त्यामुळे हा देखील सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्यासाठी कांगारूचा संघ मैदानात उतरेल. तर हा सामना जिंकून मालिका ड्रॉ करण्याचे मोठे आव्हान यजमान लंकेसमोर असणार आहे