Join us  

आयसीसी अकादमी मैदानावर आयपीएल संघांचा सराव; खेळाडूंसाठी लवकरच दिशानिर्देश

मैदान भाडेपट्टीवर घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 11:04 PM

Open in App

नवी दिल्ली : आयपीएलमधील आठ फ्रॅन्चायसी संघांच्या सरावासाठी यूएईमधील आयसीसी अकादमीचे मैदान बीसीसीआय भाडेतत्त्वावर घेणार आहे . दरम्यान, आयपीएलच्या १३ व्या पर्वाचे आयोजन १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार असून ८ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल, या वृत्तास आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी शनिवारी दुजोरा दिला. कोरोनाच्या बचावासाठी खेळाडूंसाठी काही दिशानिर्देश तयार करण्यात येणार असून यासंदर्भात बीसीसीआय अधिकृतरीत्या ईमिरेटस् क्रिकेट बोर्डाला कळवणार असल्याचे पटेल म्हणाले.

‘दिशानिर्देश (एसओपी) येत्या काही दिवसात तयार करण्यात येतील. प्रेक्षकांना प्रवेश देणे हे यूएई सरकारवर अवलंबून असेल. हा निर्णय आम्ही त्यांच्यावर सोडला आहे. सुरक्षित अंतराचे पालन मात्र करावेच लागेल. याबाबत अधिकृतरीत्या यूएई बोर्डाला कळविले जाईल,’ असे पटेल यांनी सांगितले. आयपीएल संचालन परिषदेची बैठक पुढच्या आठवड्यात होणार असून त्यात वेळापत्रकाला अंतिम मंजुरी दिली जाईल. सरकारकडून आम्हाला मंजुरी मिळण्याची आशा आहे. आयपीएल यंदा ५१ दिवस चालणार असून दररोज दोन सामने खेळवले जातील. स्पर्धा सात आठवडे चालल्यास पाच दिवस दोन सामने घेण्याची आमची मूळ संकल्पना साकार होईल. फ्रॅन्चायसी संघ २० आॅगस्टपर्यंत आयोजनस्थळी पोहोचणार आहेत. (वृत्तसंस्था)

संघांच्या सरावासाठी बीसीसीआय आयसीसी अकादमीचे मैदान भाड्याने घेणार आहे. येथे दोन पूर्ण आकाराची मैदाने असून ३८ खेळपट्ट्या आहेत. याशिवाय सहा इन्डोअर खेळपट्ट्या, ७५०० चौरस फुटाचा आऊटडोअर कंडिशनिंग एरिया आणि फिजियो थेरपी तसेच वैद्यकीय केंद्रदेखील याच ठिकाणी आहे.

दुबईतील सध्याच्या कोरोना प्रोटोकॉलनुसार लोकांनी स्वत:चा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आणल्यास क्वारंटाईन होण्याची गरज नाही. अहवाल निगेटिव्ह नसेल तर मात्र त्यांना कोरोना चाचणीस सामोरे जावे लागेल. यूएईत तीन मैदाने आहेत. त्यात दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, अबूधाबी येथील शेख झायेद स्टेडियम आणि शारजा स्टेडियमचा समावेश असून आयपीएलचे सर्व सामने या तिन्ही मैदानांवर खेळवले जातील. यूएई सरकारने परवानगी बहाल केल्यास प्रेक्षक थेट स्टेडियममध्ये सामन्यांचा लाईव्ह आनंद घेऊ शकतील. यासाठी शारीरिक अंतराचा नियम मात्र कटाक्षाने पाळावा लागेल.

टॅग्स :आयपीएल 2020बीसीसीआय