मुंबई : आयपीएलमध्ये जायबंदी झालेला भारताचा कर्णधार विराट कोहली आता फिट झाल्याचे समजते आहे. कारण मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये कोहलीने गुरुवारी सराव केला. यावेळी कोहलीबरोबर भारताचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर उपस्थित होते.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंची तंदुरुस्ती चाचणी 15 जूनला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होणार आहे. या चाचणीत पास होण्यासाठी कोहलीने सराव सुरु केला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये 14 जून रोजी कसोटी सामना खेळवण्यात येणार असून कोहली या सामन्यात खेळणार नाही. भारतीय संघ आयर्लंडमध्ये 27 आणि 29 जूनला दोन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडमध्ये 3 जुलैपासून तीन ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. कोहलीला आयपीएलमध्ये हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती.
कोहलीबाबत सूत्रांनी सांगितले की, “ कोहलीने सध्या सरावाला सुरुवात केली आहे. पण हा सराव सामन्यांसारखा जास्त काळ चालणारा नसेल. सध्या विराट 2-3 दिवस नेट्समध्ये सराव करणार आहे. त्यानंतर तो सामन्यांसाठी लागणाऱ्या फिटनेससाठी सराव करणार आहे. “