चेन्नई : ‘आयपीएल’मध्ये फायनलपर्यंतच्या यशस्वी प्रवासात आमच्या सराव सत्राचे मोठे योगदान आहे. ३ मार्च रोजी सुरू झालेले हे सराव सत्र अतिशय उपयुक्त ठरले,’ अशी प्रतिक्रिया ‘सीएसके’चा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने विजयानंतर व्यक्त केली.
माध्यमांशी संवाद साधताना ऋतुराज म्हणाला, ‘चेन्नईत नवे टर्फ टाकण्यात आल्यामुळे यंदाचे सराव सत्र आमच्यासाठी उपयुक्त ठरले. संघातील बरेच खेळाडू येथे आधी आयपीएल सामना खेळले नव्हते. खेळपट्टी कशी असेल, याचा कुणालाही अंदाज नव्हता.’
आमचे यश अनेक प्रयत्नांचा परिणाम असल्याचे सांगून ऋतुराज पुढे म्हणाला, ‘मागच्या वर्षी प्ले ऑफ गाठण्यात अपयशी ठरल्यापासूनच आम्ही पुढच्या सत्राची सुरुवात केली. काही गोष्टी सुधारण्यासाठी संघ व्यवस्थापनाने मेहनत घेतली. आमचे १२ ते १५ खेळाडू कोण असतील, याची आधीपासून कल्पना होती. पहिल्या सामन्यापासून प्रत्येक खेळाडूची भूमिका निश्चित करण्यात आली. लंकेचे खेळाडू महिश तिक्ष्णा आणि मथिसा पथिराना उशिरा दाखल झाले; पण त्यांनी पहिल्या सामन्यापासून योगदान दिले. अनेक सामन्यांत संघ बदल न करता आम्ही लय कायम राखली. सहयोगी स्टाफ आणि संघ व्यवस्थापन यासाठी प्रशंसेस पात्र ठरतात.’