सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम विराटसेनेनं करून दाखवला. भारतीय संघाला 71 वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकता आली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा हा पहिलाच आशियाई देश ठरला. या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय संघावर क्रिकेटवर्तुळातून कौतुकाचा वर्षाव झाला. मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनीही कौतुक केले.
भारतीय संघाने ॲडलेड व मेलबर्न कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. सिडनी कसोटीत भारताने पहिल्या डावातच 622 धावांचा डोंगर उभा केला. चेतेश्वर पुजारा ( 193 ) आणि रिषभ पंत ( 159* ) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला. ऑसींचा पहिला डाव 300 धावांवर गडगडला. भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देत आपला मालिका विजय पक्का केला. भारताने ही मालिका 3-1 अशी जिंकण्याची तयारी केली होती, परंतु चौथ्या कसोटीचे दोन दिवस पावसामुळे वाया गेली. या ऐतिहासिक विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लिहिले की,''आशियाई देशाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ... विराट कोहली आणि भारतीय संघाचे मनापासून अभिनंदन.''