MS Dhoni, BCCI: भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार कोण असं विचारलं तर प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकेल. काही कपिल देव यांच्याकडे बोट दाखवतील, काही अझरूद्दीन किंवा सौरव गांगुलीला ते श्रेय देतील. पण यांच्याच पंगतीत मान मिळवणारा यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणजे महेंद्रसिंग धोनी. धोनीने भारतीय संघाला ICC ची प्रत्येक ट्रॉफी जिंकवून दिली. पण धोनी आणि धोनीच्या फॅन्सच्या साठी एक वाईट बातमी आता समोर आली आहे. भारतीय क्रिकेटला एमएस धोनी हा प्रतिभावान खेळाडू देणारे प्रकाश पोद्दार (Prakash Poddar) यांचे आज निधन झाले. पोद्दार यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी हैदराबादमध्ये अखेरचा श्वास घेतला.
टॅलेंट स्पॉटर प्रकाश पोद्दार यांनी मंगळवारी जगाचा निरोप घेतला. पोद्दार हे बंगालचे माजी फलंदाज आणि BCCI चे टॅलेंट स्पॉटर होते. त्यांनीच महेंद्रसिंग धोनीचे नाव BCCI ला यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून सुचवले होते. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल आणि राजस्थान या दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व केले. ते हैदराबादमध्ये राहत होते. १९६०च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या पोद्दार यांनी १९६२ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी भारतीय कसोटी संघात स्थान मिळवले. त्यांनी सुमारे ४० च्या सरासरीने ११ प्रथम श्रेणी शतके झळकावली होती.
धोनीची निवड कशी झाली?
BCCI च्या टॅलेंट अँड रिसर्च डेव्हलपमेंट विंगचे (TRDW) माजी प्रमुख दिलीप वेंगसरकर यांच्याकडे महेंद्रसिंग धोनीच्या नावाची शिफारस करण्यात पोद्दार आणि त्याचा बंगालचा माजी सहकारी राजू मुखर्जी यांचा मोलाचा वाटा होता. एका बातमीनुसार धोनी बिहारकडून (झारखंडला बीसीसीआयचा दर्जा मिळण्यापूर्वी) जमशेदपूरमध्ये खेळत होता. पोद्दार यांनी धोनीची मोठे फटके खेळण्याची क्षमता पाहिली आणि मग त्याच्या नावाची शिफारस केली. त्यांना असे वाटले की असा जबरदस्त खेळाडू फक्त विभागापुरता मर्यादित राहू नये. त्याला देशासाठी खेळवले गेले पाहिजे आणि बीसीसीआयने त्याला तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतर धोनीची शिफारस झाली आणि त्याचा संघात समावेश करण्यात आला.