Join us  

टीम इंडियाच्या फलंदाज प्रशिक्षकपदासाठी मुंबईच्या खेळाडूचा अर्ज; संजय बांगरची गच्छंती अटळ

भारतीय संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदावर सध्या कार्यरत असलेल्या संजय बांगरची गच्छंती अटळ असल्याचे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 1:01 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदावर सध्या कार्यरत असलेल्या संजय बांगरची गच्छंती अटळ असल्याचे म्हटले जात आहे. त्यात भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आम्रे यांनी फलंदाज प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे बांगरचे पद धोक्यात आले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाच्या अपयशानंतर बांगर यांच्या कामगिरीवर बीसीसीआयनं नाराजी प्रकट केली होती. वर्ल्ड कप स्पर्धेत भारताली चौथ्या क्रमांकासाठी सक्षम पर्याय शोधण्यात अपयश आले होते आणि त्यामुळे बांगर यांचे पद धोक्यात आले होते.

ऑगस्ट 2014पासून बांगर हा भारतीय संघाचा फलंदाज प्रशिक्षक आहे आणि काही काळी त्यानं मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारीही पार पाडली होती. जुलै 2016मध्ये अनिल कुंबळे मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर बांगरकडे पुन्हा फलंदाज प्रशिक्षकपद गेले. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखालीही बांगरकडे हेच पद कायम होते. पण, इतकी वर्ष फलंदाज प्रशिक्षक असूनही बांगरला संघातील चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय शोधता आला नाही. त्याचा फटका टीम इंडियाला वर्ल्ड कप स्पर्धेतही बसला. 

बीसीसीआयनं मुख्य प्रशिक्षकपदासह अन्य महत्त्वांच्या पदांसाठी मागवलेल्या अर्जानंतर फलंदाज प्रशिक्षकपदी कोणाची निवड होईल याचीच सर्वांना उत्सुकता आहे. आता आम्रे हेच सक्षम दावेदार असल्याचे बोलले जात आहे. आम्रेंनी 11 कसोटी आणि 37 वन डे सामने खेळले आहेत. शिवाय कसोटी पदार्पणात त्यांनी दक्षिण आफ्रिकेत 103 धावांची दमदार खेळी केली होती.  त्यासह त्यांनी 2012च्या भारताच्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघाला मार्गदर्शन केले आहे. शिवाय त्यांनी मुंबई क्रिकेट संघाचे, पुणे वॉरियर्स इंडिया आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रशिक्षकपदही भूषविले आहे. ते सध्या युएसए क्रिकेट संघाचे सल्लागार आहेत.

दरम्यान, गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांच्याकडे कायम राहणार असल्यात जमा आहेत. जाँटी ऱ्होड्सनं क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला असला तरी या पदावर आर श्रीधर यांची फेरनियुक्ती होणार असल्याचे संकेत आहेत. '' मागील 18-20 महिन्यांत अरुण यांनी भारतीय गोलंदाजांसोबत केलेले काम कौतुकास्पद आहे. सध्याच्या घडीला भारताची गोलंदाजी ही जगातील सर्वोत्तम गोलंदाजी मानली जात आहे. मोहम्मद शमी सर्वोत्तम कामगिरी करत आहे आणि बुमराह सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्यामुळे त्यांना बदली करणे अवघड आहे,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ