पृथ्वी शॉ (prithvi shaw) या खेळाडूमध्ये टॅलेंट आहे. कौशल्य आहे. पण सातत्य नाही, अशी टीका केली गेली. पृथ्वी शॉच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघातूनही त्याला स्थान गमवावं लागलं. फलंदाजीत सातत्य न राहिल्यानं स्वत: पृथ्वी शॉ देखील खचलेला पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियात दौऱ्यात शॉच्या खराब कामगिरीवरून खूप टीकाही करण्यात आली. पण पृथ्वी शॉच्या फलंदाजीवर एक मराठमोळे प्रशिक्षक अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवून होते. भारतीय संघाचा कसोटीवीर अजिंक्य रहाणेचे (Ajinkya Rahane) प्रशिक्षक प्रविण आमरे (Pravin Amre) यांनी पृथ्वी शॉला वास्तवाची जाणीव करुन देत त्याला जमिनीवर आणण्याचं काम केलं. पृथ्वी शॉ मुंबईत परतल्यानंतर प्रविण आमरे यांनी शॉच्या फलंदाजीचं जणू पोस्टमार्टमचं केलं.
पृथ्वी शॉनं फलंदाजीत केलेल्या चुकांचे आमरे यांनी व्हिडिओच तयार केले होते. हे व्हिडिओ त्यांनी पृथ्वी शॉला दाखवून चुकांवर सुधारण्याची हीच संधी असल्याची जाणीव करुन दिली. पण चुका सुधारण्यासाठी आपल्याकडे जास्त वेळ देखील नाही. फक्त पाच दिवस आहेत. कारण विजय हजारे करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी केली नाही. तर करिअर खूप कठीण होऊन बसेल याची जाणीव प्रविण आमरे यांनी शॉ याला करुन दिली. आमरे सरांच्या याच प्रेरणेतून पृथ्वी शॉनं सलग पाच दिवस मैदानात खूप घाम गाळला. आमरे सरांनी दाखवून दिलेल्या चुका सुधारण्यासाठी मेहनत घेतली. याचा परिणाम विजय हजारे करंडक स्पर्धेत दिसून आला आहे. पृथ्वी शॉनं स्पर्धेत तुफान फलंदाजी केली. पृथ्वीनं ७ सामन्यांत तब्बल ७५४ धावा कुटल्या. यात एक द्विशतक आणि ४ शतकांचा समावेश आहे. विजय हजारे स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू तो ठरला. तर नाबाद २२७ धावांची सर्वाधिक वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम पृथ्वीच्या नावावर झाला आहे.
प्रविण आमरे यांनी नेमकं काय केलं?पृथ्वी शॉच्या कामगिरी सुधारणा करण्यासाठी प्रविण आमरे यांनी दैनंदिन सरावाची दोन टप्प्यात विभागणी केली. यात पहिल्या टप्प्यात पृथ्वी शॉच्या फिटनेसवर मेहनत घेण्याचं ठरवलं तर दुसऱ्या टप्प्यात फलंदाजीतील चूका सुधारण्यावर भर दिला. सलग ५ दिवस आमरे सरांनी पृथ्वीकडून भरपूर घाम गाळून घेतला आणि त्याचं फळ विजय हजारे स्पर्धेत मिळालं आहे.