भारतात मागील ३-४ दिवसांत दररोज कोरोना रुग्णांची संख्या ३ लाखांच्या घरात वाढत आहे. याचा ताण आरोग्य यंत्रणेवर पपडताना पाहायला मिळत आहे. रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटल, ऑक्सिजन मिळत नसल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. भारतातील परिस्थिती पाहून जगभरातून सांत्वन केलं जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानंही ( Babar Azam) यानंही ट्विट करून भारतीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनंही भारतीयांसाठी मदतीचं आवाहन केलं होतं.
बाबर आजमनं ट्विट केलं की,''या संकटकाळात भारतातील लोकांसाठी मी प्रार्थना करतो. हा काळ एकजुटी दाखवण्याचा आणि प्रार्थना करण्याचा आहे. लोकांनी कोरोना नियमांचं पालन करावं, हे मी आवाहन करतो. आपली सुरक्षितता आपल्या हातात आहे आणि आपण सर्वांनी मिळून याचा सामना करू शकतो.''