जोहान्सबर्ग : आयपीएल खेळण्याऐवजी बांगलादेशविरुद्ध आगामी मालिकेत देशाकडून खेळण्यास प्राधान्य द्यायला हवे, असे आवाहन दक्षिण आफ्रिका संघाचा कसोटी कर्णधार डीन एल्गर याने सहकाऱ्यांना केले आहे. माझ्या सहकाऱ्यांच्या देशहिताची ही परीक्षा असून त्यांनी देशाला प्राधान्य द्यावे, अशी भावनिक हाक एल्गरने दिली.
दक्षिण आफ्रिका संघ १८ मार्चपासून बांगलादेशविरुद्ध तीन वन डे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. आयपीएलचे आयोजन याच कालावधीत २६ मार्चपासून सुरू होत असून ते २९ मेपर्यंत चालणार आहे. वन डे सामने १८, २० आणि २३ मार्च रोजी होतील. त्यापाठोपाठ ३१ मार्चपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका १२ एप्रिलपर्यंत चालेल.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने बांगलादेशविरुद्ध खेळायचे की आयपीएलमध्ये सहभागी व्हायचे, हा निर्णय पूर्णपणे खेळाडूंवर सोडला आहे. आता खेळाडूंनी हे दाखवून देण्याची वेळ आली आहे की, आम्ही आयपीएलला नव्हे, तर देशहिताला प्राधान्य देत आहोत. खेळाडूंच्या देशहिताची ही परीक्षा आहे. कसोटी आणि वन डे क्रिकेट खेळूनच तुम्ही आयपीएलपर्यंत पोहोचलात, हे खेळाडूंनी विसरू नये, असे एल्गर म्हणाला.
आयपीएलच्या विविध दहा संघांत सहा कसोटीपटूंचा आणि तीन वन डे तज्ज्ञ अशा दक्षिण आफ्रिकेच्या ११ खेळाडूंचा समावेश आहे. एल्गर पुढे म्हणाला, ‘मी खेळाडूंना संघातील त्यांचे महत्त्व पटवून सांगणार आहे. प्रत्येक खेळाडूशी मी संवाद साधणार असून सांघिक योगदानाच्या बळावरच आम्ही इथपर्यंतचा प्रवास केला, हे कुणीही विसरू नये, हेदेखील सांगण्याचा प्रयत्न करेन.’