आयपीएल २०२५ च्या हंगामासाठी होणाऱ्या मेगा लिलावाआधी पंजाब किंग्सच्या ताफ्यातील मालकांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पंजाब संघाच्या मालकांमध्ये शेअर्ससंदर्भातील मुद्यावरून वाद निर्माण झाला आहे. हा वाद थेट कोर्टापर्यंत पोहचला आहे. हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? प्रीती झिंटानं सह संघ मालकाच्या विरोधात कोर्टात धाव घेण्यामागचं कारण काय? हे प्रश्न सध्या चांगेलच गाजत आहेत.
सह मालकाविरुद्ध प्रीती झिंटाची कोर्टात याचिका
पंजाब किंग्स इलेव्हनची सह मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे तिने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सह-मालक आणि प्रमोटर मोहित बर्मन यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.संबंधित याचिकेतून प्रीती झिंटाने पंजाब संघाच्या सह मालकाने त्याच्या वाट्यातील शेअर्सचा अन्य पक्षाला विक्री करण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाची सुणावणी २० ऑगस्टला अपेक्षित आहे.
पंजाब किंग्समध्ये कोणत्या मालकाची किती टक्के आहे हिस्सेदारी?
प्रीती झिंटा हिने लवाद आणि सामंजस्य कायदा १९९६ मधील कलम ९ अंतर्गत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मोहित बर्मन याच्याकडे केपीएच ड्रीम क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडची सर्वाधिक ४८ टक्के हिस्सेदारी आहे. दुसरीकडे प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांचा वाटा प्रत्येकी २३-२३ टक्के इतका आहे. उर्वरित ८ टक्के भागीदारी ही चौथा मालक करण पॉलची आहे. बर्मन आयुर्वेदिक आणि FMCG कंपनी डाबरचे संचालक आहेत. याशिवाय ते कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) फ्रँचायझी सेंट लूसिया किंग्सचे संचालक आणि सह मालकही आहेत.
प्रीतीनं कोणत्या गोष्टीचा केलाय विरोध
कथित माहितीनुसार, बर्मन आपल्या वाट्यातील ११.५ टक्के शेअर्स तिसऱ्या पक्षाला विक्री करण्याच्या तयारीत आहेत. याच गोष्टीला प्रीतीचा विरोध आहे. ते आपल्या वाट्याचे शेअर याप्रकारे विकू शकतात का? त्याला प्रीतीनं विरोध करण्याचे कारण काय? हा वेगळा मुद्दा आहे. पण क्रिकबझच्या वृत्तानुसार, बर्मन यांनी शेअर विक्रीसंदर्भातील वृत्त फेटाळले आहे. सध्याच्या घडीला शेअर्स विकण्याबाबत कोणताही विचार केलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. यावर प्रीती आणि नेस वाडिया दोन्ही मालकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पंजाबचा संघ कामगिरीपेक्षा अन्यच गोष्टीमुळे असतो चर्चेत
आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामापासून पंजाब संघ मैदानात उतरतोय. पण १७ वर्षांत आतापर्यंत एकदाच संघ फायनल खेळला. त्यातही ते अपयशी ठरले. संघाच्या कामगिरीपेक्षा या संघातील अंतर्गत गोष्टीच नेहमी चर्चेचा विषय राहिल्या आहेत. त्यात आता आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे.