CPL 2024 : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएल सुरू झाल्यापासून अभिनेत्री प्रीती झिंटाच्या मालकीच्या पंजाबच्या संघाला एकदाही जेतेपद पटकावता आले नाही. आयपीएल सुरू झाल्यापासून प्रीती झिंटा ट्रॉफीच्या प्रतीक्षेत आहे. तिचा संघ पंजाब किंग्ज (पूर्वीचा किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ) २०१४ मध्ये एकदा आयपीएल फायनल खेळला होता पण जिंकू शकला नाही. मात्र, आता तिची ट्रॉफीसाठी १६ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. पंजाबने प्रीतीला ट्रॉफी जिंकून दिली नाही, तर सेंट लुसिया किंग्जने तिची प्रतीक्षा संपवली.
खरे तर सेंट लुसिया किंग्जने कॅरिबियन प्रीमिअर लीग (CPL) २०२४ च्या अंतिम फेरीत गयाना ॲमेझॉन वॉरियर्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या संघाने प्रथमच सीपीएलचे जेतेपद पटकावले असून या विजयाने प्रीती झिंटाची प्रतीक्षाही संपुष्टात आली आहे. पंजाब किंग्जप्रमाणे सेंट लुसिया किंग्जच्या संघाची मालकीण प्रीती झिंटा आहे. हा संघही तिचाच आहे आणि या संघाने पहिली ट्रॉफी जिंकली आहे आणि यासोबतच प्रीतीचे २००८ पासूनचे ट्वेंटी-२० लीग ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न सेंट लुसियाने पूर्ण केले. तब्बल १६ वर्षांनंतर प्रीतीच्या ताफ्यात ट्रॉफी आली आहे.
दरम्यान, सेंट लुसियाने जेतेपद पटकावून प्रीती झिंटाचे स्वप्न पूर्ण केले. पण बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्रीला तिच्या पंजाब किंग्जने आयपीएलचे जेतेपद पटकावल्यावर अधिक आनंद होईल हेही तितकेच खरे... मागील काही हंगामातील कामगिरी पाहता पंजाबला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणेही कठीण आहे. आयपीएल २०२५ साठी संघाने रिकी पाँटिंगची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. प्रशिक्षक असताना तो पंजाबला पहिले विजेतेपद मिळवून देऊ शकतो की नाही हे पाहण्याजोगे असेल. ४० वर्षीय फाफ डूप्लेसिसच्या नेतृत्वात सेंट लुसिया किंग्जने कॅरिबियन प्रीमिअर लीगची ट्रॉफी उंचावली.