IPL Auction 2021, Shahrukh Khan: आयपीएल २०२१ च्या (IPL 2021) मोसमासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया चेन्नईमध्ये सुरू आहे. खेळाडूंवर कोट्यवधींची उधळण होत असताना तामिळनाडूच्या एका खेळाडूनं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. बेस प्राइज अवघी २० लाख रुपये असणाऱ्या या खेळाडूवर तब्बल ५ कोटी २० लाखांची बोली लावून पंजाब किंग्ज संघानं त्याला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं आहे. शाहरुख खान असं या खेळाडूचं नाव आहे. (Preity Zinta priceless reaction on Shahrukh Khan IPL 2021)
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्याशी नामसाधर्म्य असणाऱ्या तामिळनाडूच्या खेळाडूनं सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत तब्बल २२० च्या स्ट्राइक रेटनं तुफान फटकेबाजी केली होती. त्याच्या याच कामगिरीची छाप पंजाबच्या संघ मालकांवर पडलेली दिसत आहे. कारण आयपीएलच्या लिलावासाठी २० लाखांची बेस प्राइज असलेल्या शाहरुख खानवर पंजाब किंग्ज संघानं ५ कोटी २० लाखांपर्यंतची बोली लावून संघात दाखल करुन घेतलं आहे. शाहरुख खान याला संघात दाखल करुन घेतल्यानंतर पंजाब किंग्ज संघाची मालक असलेल्या अभिनेत्री प्रिती झिंटा हिच्या चेहऱ्यावरचा आनंद देखील पाहण्यासारखा ठरला. खुद्द आयपीएलच्या ट्विटर हँडलवर प्रिती झिंटाच्या उत्फूर्त प्रतिक्रियेचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. शाहरुख खान पंजबा किंग्ज संघाचा होताच प्रितीनं सेलिब्रेट केलं आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या टेबलाच्या दिशेनं पाहून आनंद व्यक्त केला.
कोण आहे शाहरुख खान?शाहरुख खान हा तामिळनाडूचा युवा फलंदाज असून सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत त्यानं दमदार कामगिरी केली आहे. त्यानं २२० च्या स्ट्राईक रेटनं तुफान फटकेबाजी केली होती. बॉलिवूड स्टार शाहरुख खान याच्या नावावरूनच या क्रिकेटपटूचं नाव ठेवण्यात आलं असलं तर तो रजनीकांत याचा जबरा फॅन आहे. तामिळनाडू संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक यानंही शाहरुख खानचं कौतुक केलं होतं. २७ मे १९९५मध्ये चेन्नईतील त्याचा जन्म झाला. कमी वयातच त्यानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. शालेय स्तरावर तो डॉन बॉस्को आणि सेंट बेड्स या दोन संघांकडून क्रिकेट केळायचा. वयाच्या १३ व्या वर्षी त्यानं तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या लीगमधून पदार्पण केलं. आक्रमक फलंदाजीमुळे तो नेहमी चर्चेत राहिला.