हैदराबाद - आयपीएलच्या गत हंगामात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी फारच निराशाजनक झाली होती. दरम्यान, हे अपयश विसरून पुन्हा आयपीएल चॅम्पियन बनण्यासाठी सनरायझर्सने मोर्चेबांधणी केली आहे. वेस्ट इंडिजचा महान माजी फलंदाज ब्रायन लारा आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेन हे आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादच्या संघात दाखल झाले आहेत. ब्रायन लाराकडे सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजी प्रशिक्षकाची तर डेल स्टेनकडे संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ब्रायन लारा आणि डेल स्टेन यांचा समावेश झाल्याने सनरायझर्सच्या प्रशिक्षक वर्गाची फळी भक्कम होणार आहे. तसेच संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी ही टॉम मुडी यांच्याकडे कायम राहणार आहे. तर ब्रायन लाराकडे संघाचा धोरणात्मक सल्लागार ही जबाबदारी सोपवली आहे. सायमन कॅटिच सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहील. तर भारताचा माजी क्रिकेटपटू हेमांग बदाणी फिल्डिंग कोच आणि स्काऊट अशी दुहेरी जबाबदारी पार पाडेल. मुथय्या मुरलीधरन फिरकी गोलंदाजांच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. सोबतच तो संघाची रणनीती ठरवण्याचंही काम करतो.
ब्रायन लाराने १३३ कसोटींमध्ये ३४ शतके आणि ४८ अर्धशतकांसह ११ हजार ९५३ धावा फटकावल्या होत्या. तर २९९ वनडेमध्ये त्याने १९ शतकांसह १० हजार ४०५ धावा कुटल्या होत्या. तसेच प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात ५०१ धावा कुटण्याचा विक्रम ब्रायन लाराच्या नावे आहे.
तर डेल स्टेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६९९ विकेट्स टिपल्या आहेत. त्यामध्ये ९३ कसोटींमध्ये ४३५ विकेट आणि १२५ वनडेंमध्ये १९६ आणि ४३ टी-२० मध्ये ६३ विकेट्स टिपल्या आहेत. तसेच डेल स्टेन तब्बल २ हजार २४३ दिवस कसोटी क्रमवारीतील अव्वल गोलंदाज राहिता होता हा एक विश्वविक्रम आहे.
२०२१ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी निराशाजनक झाली होती. एकूण १४ सामन्यांपैकी केवळी तीन सामन्यांमध्येच त्यांना विजय मिळवता आला होता. तर ११ सामन्यात हैदराबादचा पराभव झाला होता. दरम्यान, संघव्यवस्थापनाने संघाच्या नेतृत्वात बदल करताना डेव्हिड वॉर्नरकडून कर्णधारपद काढून घेत केन विल्यमसनकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र त्यालाही फार काही कमाल करता आली नव्हती. दरम्यान, हा हंगाम संपल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि रशिद खान यांनी सनरायझर्स हैदराबादची साथ सोडली आहे.
Web Title: Preparing to be champions again, Sunrisers Hyderabad handed over big responsibility to Brian Lara and Dale Steyn
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.