सिडनी : ‘क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) माजी मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांची छबी राक्षसाच्या रूपामध्ये केली,’ अशी टीका करत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज ॲडम गिलख्रिस्टने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला फटकारले. २०१८ सालच्या चेंडू छेडछाड प्रकरणानंतर ऑस्ट्रेलिया संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेतलेल्या लँगर यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गिलख्रिस्टने सांगितले की, प्रशिक्षकपदासाठी बदल किंवा कॉर्पोरेटमधील लोकांकडून विश्लेषण ऐकण्याची मला गरज वाटत नाही. याने मला आता काहीच फरक पडणार नाही. संघातील काही खेळाडू आणि सहायक स्टाफ सदस्यांसोबत याविषयी चर्चा करण्यात आली आणि त्यांना जस्टिन संघात नकोय. ही गोष्ट लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही लोकांनी त्याची छबी राक्षसाप्रमाणे केली आहे. जस्टिन लँगर असा अजिबात नाही.’लँगरसोबत ऑस्ट्रेलिया संघातून खेळलेला गिलख्रिस्ट पुढे म्हणाला की, तो स्वत:मधील कमकुवतपणा सांगण्यात पुढे राहील; पण त्याचवेळी तुमच्यासोबत बसून तुमच्या नजरेला नजर भिडवून कमकुवतपणा दूर करण्यावर काम करेल. त्यामुळे त्याची प्रतिमा राक्षसाच्या रूपात समोर आणल्याने वैयक्तिकरीत्या त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, याचा विचार व्हावा.लँगरच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाने गेल्यावर्षी पहिल्यांदाच टी-२० विश्वविजेतेपद पटकावले. यानंतर ॲशेस मालिकेतही इंग्लंडविरुद्ध ४-० असे निर्विवाद वर्चस्व राखले. मुख्य प्रशिक्षक म्हणून लँगर अजून कार्यरत राहू इच्छित होते; परंतु त्यांच्या कार्यशैलीवर गेल्या काही महिन्यांपासून वरिष्ठ खेळाडूंनी तक्रारी नोंदवल्या होत्या.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- लँगरला राक्षसरूपात सादर केल्याने गिली भडकला, क्रिकेट ऑस्ट्रेलियाला फटकारले
लँगरला राक्षसरूपात सादर केल्याने गिली भडकला, क्रिकेट ऑस्ट्रेलियाला फटकारले
गिलख्रिस्टने सांगितले की, प्रशिक्षकपदासाठी बदल किंवा कॉर्पोरेटमधील लोकांकडून विश्लेषण ऐकण्याची मला गरज वाटत नाही. याने मला आता काहीच फरक पडणार नाही.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 10:25 AM