Press Conference BCCI : श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआयने क्रिकेट वर्तुळात रंगलेल्या चर्चांची उत्तरे दिली. ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांना ट्वेंटी-२० संघात संधी न मिळाल्याने चाहते रोष व्यक्त करत आहेत. २७ जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकेच्या धरतीवर तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाईल. टीम इंडियाचा नवनिर्वाचित प्रशिक्षक गौतम गंभीरची प्रशिक्षक म्हणून ही पहिलीच परीक्षा आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध बांबीवर प्रकाश टाकला. यावेळी आगरकरने सूर्याला कर्णधार बनवल्याचे कारण सांगताना हार्दिकच्या फिटनेसबद्दल भाष्य केले.
अजित आगरकर म्हणाला की, सूर्यकुमार यादव कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार असल्याने त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. तो ट्वेंटी-२० मधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. सर्व फॉरमॅट खेळू शकेल असा कर्णधार असावा असे सर्वांनाच वाटते. हार्दिक पांड्याच्या फिटनेसच्या समस्यामुळे त्याला वगळण्यात आले. हार्दिक पांड्या हा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, पण फिटनेस हे एक आव्हान आहे आणि कोणीतरी सतत उपलब्ध असावे अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी पावले टाकली जात आहेत. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना वगळण्यामागे कोणतेही कारण नाही. आगामी काळात कसोटी क्रिकेट मोठ्या प्रमाणात आहे. तिथे जड्डू असेल.
गौतम गंभीरने सांगितले की, मी नेहमीच खेळाडूंना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. हसत खेळत असलेले ड्रेसिंग रूम महत्त्वाचे आहे. मला गोष्टी गुंतागुंती करायच्या नाहीत. मी एक अतिशय यशस्वी संघाचे नेतृत्व करत आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा संघ -वन डे - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा. ट्वेंटी-२० - सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.