Join us  

कर्णधारासोबतच्या पत्रकार परिषदेला दांडी, विराट कोहली बीसीसीआयमधील वादावर मौन, प्रशिक्षक राहुल द्रविडच्या भूमिकेमुळे संभ्रम वाढला 

Rahul Dravid News: Virat Kohli आणि BCCIमध्ये वाद निर्माण झाला असताना भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड मात्र या साऱ्या वादापासून दूर आहे. राहुल द्रविड या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगून का आहे? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 4:54 PM

Open in App

मुंबई - भारतीय क्रिकेटमध्ये सध्या मोठा वाद निर्माण झालेला आहे. या वादादरम्यानच भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या खडतर दौऱ्यावर रवाना झाला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय संघाला अद्याप एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. दरम्यान, विराट कोहली आणि बीसीसीआयमध्ये वाद निर्माण झाला असताना भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड मात्र या साऱ्या वादापासून दूर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी झालेल्या कर्णधारासोबतच्या पत्रकार परिषदेलाही तो अनुपस्थित होता. त्यामुळे राहुल द्रविड या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगून का आहे? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. मात्र या पत्रकार परिषदेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षक राहुल द्रविड यावेळी अनुपस्थित होता. कुठलाही परदेश दौरा, मालिका किंवा आयसीसीची स्पर्धा असेल तेव्हा कर्णधार आणि प्रशिक्षक एकत्रितपणे प्रसार माध्यमांशी संवाद साधतात. तिथे विविध प्रश्नांची उत्तरे देतात. याबाबत कुठला नियम नसला तरी वर्षानुवर्षांपासून हा शिरस्ता सुरू आहे. मात्र ही प्रथा यावेळी पाळली गेली नाही. उलट विराटच्या या पत्रकार परिषदेनंतर वाद अधिकच वाढत गेला.

मात्र या पत्रकार परिषदेला प्रशिक्षक राहुल द्रविड अनुपस्थित राहिल्यानेही, अनेक प्रश्न निर्माण झाले. भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा हा पहिलाच परदेश दौरा आहे, त्यामुळे तो प्रसारमाध्यमांशी संवाद साधून विविध प्रश्नांची उत्तरे देईल, अशी अपेक्षा होती.

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेपूर्वी राहुल द्रविडने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी रोहित शर्मा त्याच्यासोबत होता. तसेच मालिका संपल्यानंतरही राहुल द्रविड प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना सामोरा गेला होता. मात्र तेव्हाची वेळ वेगळी होती आणि आताच्या घडामोडी वेगळ्या आहेत.

या सर्व वादात राहुल द्रविडसारख्या शांत संयमी माणसासमोर मोठे आव्हान निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. समालोचक हर्षा भोगले यांनी हा वाद इथपर्यंत पोहोचता कामा नये होता. दोघेही भारतीय संघातील स्टार आहेत, अशा परिस्थितीत दोघांमध्ये चर्चा झाल्यास हा वाद निवळू शकतो. मात्र द्रविडसमोर सध्या कठीण परिस्थिती आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये त्याच्या मार्गदर्शनाची कसोटी लागणार आहे. कारण तिथे विजय मिळवण्यासाठी त्याच्या संघाचा कर्णधार आणि खेळाडू सकारात्मक भूमिकेमध्ये राहिले पाहिजे.

राहुल द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत. मात्र तो कायम वादांपासून दूर राहतो. आताही त्याचे वर्तन तसेच आहे. कारण तो अशा पदावर आहे जिथे त्याचं मत सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या वादावर द्रविड कधी बोलणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलेलं आहे.  

टॅग्स :राहुल द्रविडविराट कोहलीबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ
Open in App