अबुधाबी : सध्याचा विजेता मुंबई इंडियन्स मागच्या सामन्यातील पराभव विसरुन गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएल सामन्यात विजयाच्या निर्धाराने उतरणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांना किरकोळ दुखापतींमुळे चेन्नईविरुद्ध मुंबईने विश्रांती दिली होती. चेन्नईने मुंबईचा २० धावांनी पराभव केला. केआरविरुद्ध मात्र रोहित खेळणार असल्याचे सूतोवाच मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी केले आहेत.
दुसरीकडे केकेआरने आरसीबीवर नऊ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली. ही कामगिरी कायम राखण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. गुणतालिकेत आठ गुणांसह चौथ्या स्थानी असलेल्या मुंबईने नेहमीसारखी संथ सुरुवात केली असली, तरी मुसंडी मारण्यात कसलीही कसर राखणार नाही, असा व्यवस्थापनाला विश्वास आहे. त्यासाठी चेन्नईविरुद्ध विजयी पाठलाग करताना झालेल्या चुका फलंदाजांना सुधाराव्याच लागतील. १५६ धावांचा पाठलाग करताना सौरभ तिवारीचा अपवाद वगळता अन्य फलंदाज कुचकामी ठरले होते.
विजयी सुरुवात मिळाल्याने केकेआरचे खेळाडू उत्साही आहेत. इयोन मोर्गनचा हा संघ सहाव्या स्थानी असून आरसीबीविरुद्ध फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि अष्टपैलू आंद्रे रसेल यांनी भेदक मारा केला. फलंदाजीत शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी विश्वास सार्थ ठरवित दहा षटकात सामना संपविला. केकेआरचा त्या सामन्यातील आक्रमकपणा मुंबईविरुद्ध कायम राखण्याच्या इराद्याने मोर्गनचा संघ मैदानात उतरणार आहे.