चॅम्पियन मुंबई इंडियन्सने गेल्या मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सला सहजपणे नमवत विक्रमी पाचवे जेतेपद पटकावले. यंदाच्या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी छाप पाडली. त्यामुळेच पुढच्या वर्षी होणाऱ्या लिलाव प्रक्रियेमध्ये या खेळाडूंना जबरदस्त ‘भाव’ मिळणार हे नक्की. अशाच काही खेळाडूंचा यानिमित्ताने घेतलेला आढावा...
सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स)
चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीला मजबुती दिली ती सूर्यकुमारने. त्याने आपल्या शैलीने सर्वांनाच प्रभावित केले. सूर्याने १६ सामन्यांतून ४ अर्धशतकांसह १४५.०१ च्या स्ट्राईक रेटने ४८० धावा फटकावल्या. सूर्यासाठी मुंबईने ३.२ कोटी रुपये मोजले. त्याच्यासाठी आता अनेक संघांमध्ये चढाओढ रंगल्यास आश्चर्य वाटायला नको.
ॠतुराज गायकवाड (सीएसके)
स्टार सुरेश रैनासाठी बदली खेळाडू म्हणून निवड झाल्यानंतर ॠतुराज कोविड पॉझिटिव्ह आढळला. यामुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना तो मुकला. मात्र यानंतर त्याने सहा सामन्यांतून तीन अर्धशतके ठोकली. त्याने १२०.७१च्या स्ट्राईक रेटने २०४ धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने सलग तीन सामन्यांत अर्धशतक केले. सीएसकेनेही ॠतुराजला २० लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले होते.
रवी बिश्नोई
(किंग्ज ईलेव्हन पंजाब)
गुगली चेंडूच्या जोरावर अनेक स्टार फलंदाजांना बुचकाळ्यात पाडलेल्या रवीने पंजाबसाठी तुफान कामगिरी केली. १४ सामन्यांतून १२ बळी घेतले असले, तरी त्याच्यापुढे फटकेबाजी करताना अनेक स्टार फलंदाजांना चांगलाच विचार करावा लागला.
देवदत्त पडिक्कल (आरसीबी)
आयपीएल पदार्पण केलेल्या देवदत्तने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी तुफानी कामगिरी केली. त्याने भारताचा स्टार फलंदाज युवराज सिंगची आठवण करुन देत सर्वांनाच प्रभावित केले. त्याने १५ सामने खेळताना १२४.८०च्या स्ट्राईक रेटने ४७३ धावा फटकावल्या. यादरम्यान त्याने ५ अर्धशतकेही झळकावली. आरसीबीने त्याला २० लाख रुपयांमध्ये आपल्या संघात घेतले होते, मात्र आता पुढील वर्षी तो नक्कीच मोठा भाव खाऊन जाईल.
जोफ्रा आर्चर (राजस्थान रॉयल्स)
राजस्थानसाठी यंदाचा ट्रम्प कार्ड ठरलेल्या आर्चरने आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर सर्वांचा अवाक् केले. राजस्थानने त्याच्यासाठी ७.२० कोटी मोजले आणि त्याची यंदाची कामगिरी पाहता राजस्थान त्याला रिलिज करेल याची शक्यता कमी आहे. आर्चरने १४ सामन्यांतून २० बळी घेताना ११३ धावा कुटताना मोक्याच्या वेळी फटकेबाजीही केली.
इशान किशन
(मुंबई इंडियन्स)
तुफानी फटकेबाजीच्या जोरावर इशान किशनने सर्वच चाहत्यांची आणि दिग्गजांची वाहवा मिळवली. भविष्यातील स्टार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळेच पुढील लिलावात किशनसाठी पैसा ओतण्यास सर्वच फ्रेंचाईजी तयार होतील. किशनने १४ सामन्यांत १४५.७६च्या स्ट्राईक रेटने ५१६ धावा फटकावल्या. त्याने ४ अर्धशतके झळकावली असून त्याची एक शतकी खेळी अवघ्या एका धावेने हुकली.
रियान पराग याच्यासाठी राजस्थानने केवळ २० लाख रुपये मोजले होते. मात्र तो पैसा वसूल खेळाडू ठरला. गेल्या सत्रात अर्धशतक ठोकणारा सर्वांत युवा खेळाडू म्हणून रियानने विक्रम केला. यंदा त्याने तडाखेबंद फटकेबाजीने लक्ष वेधले. यंदा त्याला फलंदाजीची संधी फारशी मिळाली नाही, पण जी संधी मिळाली, ती साधत त्याने सर्वांनाच प्रभावित केले.
Web Title: 'price' of these players will increase in IPL auction 2021
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.