Ashes, ENG vs AUS: ऑस्ट्रेलियामध्ये सध्या अॅशेस मालिका सुरू आहे. यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ मालिकेत ३-० असा आघाडीवर आहे. तर चौथ्या सामन्यातही त्यांची स्थिती भक्कम आहे. असे असताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शुक्रवारी थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये हजेरी लावली. सिडनीच्या मैदानावर चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होता. त्यावेळी स्कॉट मॉरिसन हे थेट समालोचन कक्षात आले आणि तेथून त्यांनी काही वेळ समालोचनाचा आनंद लुटला.
पाहा व्हिडीओ-
पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हे समालोचन कक्षात आले त्यावेळी त्यांनी आधी दोन विश्वविजेते क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्ट आणि इशा गुहा यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी माईक आणि हेडफोन्स लावून थेट समालोचकाची भूमिका बजावली. मालिकेतील ही कसोटी मॅकग्रा फाऊंडेशनला आर्थिक सहाय्य करण्यासाठी असल्याने त्यामुळे मॉरिसन यांनी या फाऊंडेशनला ४० मिलियन डॉलर्सचे अनुदान मंजूर केलं. ऑस्ट्रेलियन सरकार मॅकग्रा फाऊंडेशनच्या सत्कार्याला नेहमीच पाठिंबा देईल, असंही मॉरिसन यावेळी म्हणाले.
मॉरिसन यांच्या कॉमेंट्री बॉक्समधील हजेरीने क्रिकेट फॅन्सना आनंद झालाच पण त्यांना आश्चर्य वाटलं नाही. याआधी २०१९ साली पंतप्रधान एकादश विरूद्ध श्रीलंका या सामन्यात मॉरिसन स्वत: वॉटरबॉय बनून पाणी घेऊन मैदानावर गेले होते. तसंच, रिषभ पंत आणि टीम पेन यांच्या वादावरही मॉरिसन यांनी मजेशीर टिपण्णी केली होती.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना ४०० पार मजल मारली. त्यात उस्मान ख्वाजाने शतक झळकावले. त्यानंतर प्रत्युत्तरात इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो याने दमदार शतक लगावले. बेन स्टोक्सनेही अर्धशतक केले. पण इतर फलंदाजांच्या हाराकिरीमुळे इंग्लंडला पहिल्या डावात पिछाडीवरच राहावं लागलं.