कोलकाता - ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकातामधील ईडन गार्डनवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुस-या सामन्यात हॅट्ट्रीक घेत चायनामन बॉलर कुलदीप यादवने नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. आपल्यासाठी हा रेकॉर्ड अत्यंत खास असल्याचं त्याने सांगितलं. मात्र हा रेकॉर्ड करण्यासाठी त्याला मोलाची मदत मिळाली ती माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची. हॅट्ट्रीक बॉल टाकण्याआधी कुलदीप यादवने महेंद्रसिंग धोनीशी बातचीत केली. धोनीने दिलेला मोलाचा सल्ला कुलदीप यादवच्या कामी आला आणि सुर्वणअक्षरात त्याचं नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कोरलं गेलं.
कुलदीपने 33 व्या षटकात वेड आणि एगरची विकेट मिळवल्यानंतर धोनीसोबत बातचीत झाल्याचा खुलासा केला. कुलदीप यादवने सांगितलं की, हॅट्ट्रीक बॉल टाकण्याआधी मी धोनीचा सल्ला घेतला होता. 'कशाप्रकारचा बॉल टाकला पाहिजे असं मी धोनीला विचारलं होतं', असं कुलदीप यादवने सांगितलं.
कुलदीप यादवने सांगितलं की, 'मी माही भाईला विचारलं की मला कशाप्रकारचा बॉल टाकला पाहिजे. यावर महेंद्रसिंग धोनीने 'तुला जशी इच्छा आहे तसा बॉल टाक' असा सल्ला दिला. मला आनंद आहे की धोनीने मला साथ दिली'.
धोनीने दिलेला सल्ला कुलदीप यादवच्या कामी आला आणि एक नवा रेकॉर्ड कुलदीप यादवच्या नावे नोंद झाला. कुलदीप यादवने चेतन शर्मा (1987) आणि कपिल देव (1991) यांच्या क्लबमध्ये एंट्री केली आहे. आतापर्यंत फक्त दोनच भारतीय गोलंदाज हॅट्ट्रीक घेण्यात यशस्वी झाले होते. कुलदीप यादव तिसरा भारतीय गोलंदाज ठरला.
ईडन गार्डनवर एकदिवसीय सामन्यात हॅट्ट्रीक घेणारे कपिल देव एकमेव गोलंदाज होते. तर चेतन शर्मा भारताकडून एकदिवसीय सामन्यात हॅट्ट्रीक घेणारे पहिले गोलंदाज होते. विशेष म्हणजे, कुलदीप यादवने याआधी 2014 मध्ये खेळल्या गेलेल्या अंडर-19 वर्ल्डकपमध्ये स्कॉटलंडविरोधातही हॅट्ट्रीक घेतली होती.
सामना संपल्यानंतर कुलदीप यादवने सांगितलं की, 'ही हॅट्ट्रीक माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. या हॅट्ट्रीकने सामन्याची बाजूच बदलली. हा एक अभिमानाचा क्षण आहे'.
भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करताना दुस-या एकदिवसीय सामन्यात विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाचा ५० धावांनी पराभव करुन ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. कुलदीप यादवने घेतलेल्या हॅट्ट्रीकच्या जोरावर भारताने बाजी मारली. प्रथम फलंदाजी करुन २५२ धावा उभारल्यानंतर भारताने आॅसीला ४३.१ षटकात २०२ धावांत गुंडाळले.