मुंबई : भारताच्या पृथ्वी शॉने राजकोट कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणातच शतक झळकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण केले. पहिल्याच कसोटी सामन्यात मुंबईच्या या 18 वर्षीय खेळाडूने 154 चेंडूंचा सामना करताना धडाकेबाज 134 धावांची खेळी साकारली. त्याने 87.01च्या स्ट्राईक रेटने 19 चौकारांच्या मदतीने ही खेळी साकारली. शुक्रवारी त्याने आणखी एक पराक्रम केला. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम याला जे दोन वर्षांत जमले नाही ते पृथ्वीने एका कसोटी सामन्यातच करून दाखवले.
या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला. पदार्पणात सामनावीर पुरस्कार जिंकणारा पृथ्वी हा सहावा भारतीय खेळाडू ठरला. याआधी प्रविण अमरे ( 1992), आर पी सिंग ( 2006), आर अश्विन ( 2011), शिखर धवन ( 2013) आणि रोहित शर्मा ( 2013) यांनी पदार्पणात सामनावीर पुरस्कार जिंकला होता. सर्वात कमी वयात सामनावीर ठरलेला पृथ्वी हा तिसरा भारतीय खेळाडू. या विक्रमात सचिन तेंडुलकर ( 17 वर्षे व 107 दिवस) आणि रवी शास्त्री ( 18 वर्षे व 294 दिवस ) अव्वल दोन स्थानावर आहेत. पृथ्वीचे आत्ताचे वय 18 वर्षे व 331 दिवस आहे.
आयसीसीने शुक्रवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत पृथ्वीने 418 गुणांसह 73 वे स्थान पटकावले. दुसरीकडे दोन वर्षांपूर्वी पाकिस्तान संघाकडून कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या बाबरला 84 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे दोन वर्षांच्या कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या बाबरवर एक कसोटी खेळलेला पृथ्वी भारी पडल्याची चर्चा सुरू आहे.
Web Title: prithvi shaw in 73 spot on icc test ranking
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.