मुंबई : भारताच्या पृथ्वी शॉने राजकोट कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणातच शतक झळकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण केले. पहिल्याच कसोटी सामन्यात मुंबईच्या या 18 वर्षीय खेळाडूने 154 चेंडूंचा सामना करताना धडाकेबाज 134 धावांची खेळी साकारली. त्याने 87.01च्या स्ट्राईक रेटने 19 चौकारांच्या मदतीने ही खेळी साकारली. शुक्रवारी त्याने आणखी एक पराक्रम केला. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम याला जे दोन वर्षांत जमले नाही ते पृथ्वीने एका कसोटी सामन्यातच करून दाखवले.
या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला. पदार्पणात सामनावीर पुरस्कार जिंकणारा पृथ्वी हा सहावा भारतीय खेळाडू ठरला. याआधी प्रविण अमरे ( 1992), आर पी सिंग ( 2006), आर अश्विन ( 2011), शिखर धवन ( 2013) आणि रोहित शर्मा ( 2013) यांनी पदार्पणात सामनावीर पुरस्कार जिंकला होता. सर्वात कमी वयात सामनावीर ठरलेला पृथ्वी हा तिसरा भारतीय खेळाडू. या विक्रमात सचिन तेंडुलकर ( 17 वर्षे व 107 दिवस) आणि रवी शास्त्री ( 18 वर्षे व 294 दिवस ) अव्वल दोन स्थानावर आहेत. पृथ्वीचे आत्ताचे वय 18 वर्षे व 331 दिवस आहे.