मुंबई : उत्तेजक द्रव्यसेवन केल्याप्रकरणी भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ याच्यावर आठ महिन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण या बंदीनंतर मैदानात पृथ्वीने झोकात पुनरागमन केले आहे. त्यामुळे आता पृथ्वीला पुन्हा एकगा भारतीय संघात स्थान देण्यात येणार आहे, असे म्हटले जात आहे.
बंदी संपल्यावर पृथ्वी सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत उतरला होता. या स्पर्धेत पृथ्वीने तीन अर्धशतके झळकावली होती. त्याचबरोबर रणजी स्पर्धेमध्ये बडोद्याविरुद्ध खेळतानाही ६६ धावांची खेळी साकारली आहे. त्यामुळे आता पृथ्वीसाठी भारतीय संघाचे दरवाजे पुन्हा एकदा खुले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. पण पृथ्वीला नेमके कधी संघात स्थान मिळू शकते, हे जाणण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल...
भारताचा संघ फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या सामन्यात राखीव सलामीवीर म्हणून पृथ्वीची भारतीय संघात निवड होऊ शकते. सध्याच्या घडीला रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल हे दोघे भारताच्या सलामीची धुरा सांभाळत आहेत. पण न्यूझीलंडचा दौरा सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या 'अ' संघांमध्ये सराव सामना खेळवण्यात येणार आहे. या सराव सामन्यात पृथ्वी, मयांक, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांचा समावेश असेल, असे म्हटले जात आहे.