मुंबई : भारतीय संघाचा खेळाडू पृथ्वी शॉवरमुंबईत हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, सेल्फी घेण्यास नकार दिल्याने काही चाहते संतप्त झाले आणि त्यांनी क्रिकेटरच्या गाडीवर हल्ला केला. ही घटना बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान पृथ्वी शॉ त्याच्या मित्रासोबत कारमध्ये बसला होता. त्यानंतर काही लोक तेथे आले आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यास सांगितले. पृथ्वीने नकार दिल्यानंतर त्याच्या कारवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला करण्यात आला. चाहत्यांनी क्रिकेटपटूच्या कारची तोडफोड केली आणि 50 हजार रुपयांची मागणीही केली.
या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. यापैकी 2 आरोपींची ओळख पटली असून 6 अज्ञात आहेत. तक्रारीत नाव असलेल्या लोकांपैकी शोभित ठाकूर आणि सना उर्फ सपना गिल अशी दोघांची नावे आहेत. दोघांनीही आरोप फेटाळून लावत पृथ्वी शॉनेच आधी हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
महिलेने आरोप फेटाळले
या प्रकरणी आरोपी सना उर्फ सपना गिलचे वकील अली काशिफ खान यांनी म्हटले की, हा वाद सपनाने नाही तर पृथ्वी शॉने सुरू केला होता. पृथ्वीच्या हातात बॅट असल्याचेही या हाणामारीच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. वकिलांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी सपना हिला ओशिवरा पोलीस ठाण्यात बसवून ठेवले असून मेडिकललाही जाऊ दिले जात नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहारा स्टार हॉटेलजवळ ही घटना घडली. पृथ्वी शॉ आणि त्याचे मित्र एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते. यादरम्यान क्रिकेटरचा एक चाहता आणि एक महिला चाहता त्याच्या टेबलाजवळ आला. महिला चाहत्याने क्रिकेटरसोबत सेल्फी काढण्यास सुरुवात केली. काही फोटो आणि व्हिडीओ काढूनही ती थांबली नाही, तेव्हा पृथ्वीने रेस्टॉरंटच्या मालकाला फोन करून चाहत्यांना हटवण्यास सांगितले. रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने चाहत्यांना तेथून हटवले. मात्र, यामुळे संतापलेले दोन्ही चाहते रेस्टॉरंटबाहेर क्रिकेटरची वाट पाहत राहिले.
बेसबॉलच्या बॅटने हल्ला
आरोपींनी पृथ्वी शॉच्या कारवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला केला. एका सिग्नलवर गाडी थांबवून विंडशील्ड तोडले. चाहत्यांनी पृथ्वीच्या मित्राकडे 50 हजार रुपयांची मागणी देखील केली. कारची काच फुटल्याने प्रकरण आणखी चिघळले. क्रिकेटपटू आणि चाहते यांच्यात वादावादी झाली. नंतर ओशिवरा पोलिसांनी पृथ्वीला दुसऱ्या गाडीतून घरी पाठवले.
या कलमांतर्गत गुन्हा दाखल, अटक नाही
ओशिवरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 143, 148, 149, 384, 437, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सना उर्फ सपना गिल आणि शोभित ठाकूर यांच्यासह एकूण 8 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Prithvi Shaw got into an argument with a female fan over taking a selfie, the video of which is going viral on social media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.