भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यानं मांडवा येथील धोकावडे गावातील लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. निसर्ग वादळाच्या तडाख्यात या गावातील अनेकांच्या घरांचं नुकसान झालं. 20 वर्षीय पृथ्वीनं ही घरं पुन्हा उभी करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे आणि तो येथील लोकांना आर्थिक मदतही करत आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून पृथ्वी शॉ धोकावडे गावातच अडकला आहे. राजकीय नेते संजय पोतनीस यांच्या फार्महाऊसवर तो राहत आहे.
''लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून पृथ्वी अलिबाग येथेच आहे. निसर्ग वादळानं येथे प्रचंड नुकसान केलं आहे. संपूर्ण गावाला त्याचा तडाखा बसला आहे. घरांचे छप्पर उडाली आहेत. माझ्या बंगल्याचंही नुकसान झालं आहे. पृथ्वी आणि माझ्या मुलानं येथील परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली आहे आणि त्यांनी ग्रामस्थांना मदतीचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी केवळ ही घरं उभी करण्यात मदत करत नाही, तर लोकांना आर्थिक मदतही करत आहे,'' असे पोतनिस यांनी 'Mid Day' शी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाख 10 हजारांवर पोहोचला आहे. त्यापैकी 57800 रुग्ण बरे झाले आहेत, तर 5500 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. निसर्ग वादळामुळे येथे प्रचंड नुकसान झाले आहे आणि राज्य सरकारनं वादळात नुकसानग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केली आहे. अन्य खेळाडूंप्रमाणे पृथ्वी मार्च महिन्यापासून क्रिकेट खेळलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याची निवड झाली होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे मालिकाच रद्द झाली. 20 वर्षीय पृथ्वीला उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याप्रकरणी 8 महिन्यांच्या निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते.
शहीद जवानाचे वडील म्हणाले, नातवंडांनाही लढायला पाठवणार... वीरूने केला 'बापमाणसा'ला सलाम
कोरोनाच्या संकटात मोठ्या क्रिकेट लीगची घोषणा; 8 संघांमध्ये रंगणार 46 सामन्यांचा थरार!