मुंबई : भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ पुन्हा एका दुखापतग्रस्त झाला आहे. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाण्याच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या या दुखापतीमुळे पृथ्वीच्या करीअरला धक्का बसू शकतो.
ऑस्ट्रेलियामध्ये सराव करत असताा पृथ्वीला जबर दुखापत झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिमध्ये न खेळता त्याला उपचारांसाठी थेट भारतात पाठवण्यात आले होते. त्यानंतर पृथ्वी हा उत्तेजक द्रव्य चाचणीमध्ये दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी उठल्यावर पृथ्वी मुंबईकडून काही सामने खेळला आणि त्यामध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. पण गेल्या दोन रणजी करंडक सामन्यांमध्ये पृथ्वीला फारशी चमक दाखवता आला नव्हती.
सध्याच्या घडीला मुंबई आणि कर्नाटक यांच्यामध्ये मुंबईत रणजी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात मुंबईची पहिल्या डावाता दाणादाण उडाली. या सामन्यात मुंबईला पहिल्या डावात १९४ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्नाटकने दिवसअखेर ३ बाद ७९ अशी मजल मारली आहे.
या सामन्यात पृथ्वीला पुन्हा एकदा मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. या सामन्यात पृथ्वीला २९ धावा करता आल्या. मुंबईचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना पृथ्वीला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यात ओव्हर थ्रो वाचवण्यासाठी पृथ्वी प्रयत्न करत होता. त्यावेळी पृथ्वीच्या खांद्याला जबर दुखापत झाल्याचे म्हटले जात आहे. कारण दुखापत झाल्यावर पृथ्वीला थेट मैदानाबाहेर नेण्यात आले होते. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर भारतीय अ संघ १० जानेवारीला जाणार आहे. आता फक्त काहीच दिवस पृथ्वीच्या हातामध्ये आहेत. जर या आठ दिवसांत पृथ्वी तंदुरुस्त होऊ शकला नाही, तर त्याला या मोठ्या दौऱ्याला मुकावे लागू शकते.