- रोहित नाईकमुंबई : 'पृथ्वीची पदार्पणातील शतकी खेळी अभिमानास्पद आहे. तो या खेळीसाठी पूर्णपणे सज्ज होता. कसोटी पदार्पणाचे कोणतेही दडपण त्याच्यावर नव्हते. आपला नैसर्गिक खेळाच्या जोरावर त्याने वर्चस्व राखले,' अशा शब्दांत पृथ्वी शॉचे शालेय प्रशिक्षक राजू पाठक यांनी पृथ्वीचे कौतुक केले. गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण करताना शतकी खेळी केली. आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पदार्पणात शतक ठोकणारा पृथ्वी भारताचा १५वा फलंदाज ठरला. याआधीचा पदार्पणात कसोटी शतक ठोकणारा फलंदाजही मुंबईकर होता हे विशेष. याआधी २०१३ मध्ये रोहित शर्माने विंडीजविरुद्धच पदार्पण करताना कसोटी शतक झळकावले होते.
पृथ्वीच्या शतकी तडाख्यानंतर प्रशिक्षक पाठक यांनी 'लोकमत'ला सांगितले की, 'दोन दिवसांपूर्वीच माझ पृथ्वीसोबत बोलणं झालेलं. त्याला कोणत्याही दडपणाशिवाय मुक्तपणे खेळ, असंच म्हटलं होतं. पृथ्वीही पूर्ण सज्ज होता. मी नक्कीच चांगली खेळी करेन, असा विश्वास त्याने व्यक्त केलेला. तो शब्द त्याने खरा केला. पृथ्वीच्या खेळीचा अभिमान आहे.'
पृथ्वीने आपल्या खेळामध्ये केलेल्या काही बदलांविषयी पाठक म्हणाले की, 'त्याचा खेळ आता उच्चस्तराचा झाला असून त्याने आपल्या खेळण्याच्या पद्धतीत काही बदलही केले असून त्याचा त्याला फायदा झाला. पृथ्वीने आपला बॅकफूट खूप मजबूत केला आहे. त्याने नैसर्गिक खेळावर भर देत कुठेही घाई केली नाही. त्याच्या खेळीमध्ये आत्मविश्वास दिसत होता.'राजू पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली रिझवी स्प्रिंगफिल्डकडून खेळताना पृथ्वीने मुंबई क्रिकेट गाजवले. सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यानंतर ४ दिवसांनीच पृथ्वीने शालेय क्रिकेटमध्ये ५४६ धावांची विक्रमी खेळी केली होती. तेव्हापासून सचिनसोबत होणारी तुलना पृथ्वीने आज सार्थ ठरविली, अशी प्रतिक्रियाही क्रिकेटप्रेमींकडून मिळत आहे. पृथ्वीने सचिनप्रमाणेच रणजी व दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पदार्पणात शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.