भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज पृथ्वी शॉ याच्यावर २०१९ साली प्रतिबंधित पदार्थंचं सेवन केल्याप्रकरणी बंदीची कारवाई करण्यात आली होती. बीसीसीआयनंपृथ्वी शॉवर तेव्हा आठ महिन्यांच्या बंदीची कारवाई केली होती. त्यामुळे शॉला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर राहावं लागलं होतं. त्यानंतर पृथ्वी शॉन दमदार पुनरागमन देखील केलं. पण आता त्यानं २०१९ साली घडलेल्या त्या घटनेची माहिती जाहीर केली आहे. प्रतिबंधित पदार्थाचं सेवन का केलं होतं? याची माहिती त्यानं दिली आहे. यासाठी त्यानं स्वत:ला आणि वडिलांना जबाबदार धरलं आहे.
'क्रिकबज'ला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वी शॉनं प्रतिबंधित पदार्थांच्या सेवनाचा उल्लेख केला आहे. "२०१८-१९ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मी खूप उत्सुक होतो. पण माझ्या पायाला दुखापत झाली. संघ व्यवस्थापनानं मला तंदुरुस्त करण्यासाठी मेहनत घेतली. पण मला बरं होण्यास खूप वेळ लागत होता. त्यावेळी मला खूप त्रास होत होता आणि त्यामुळे मी खूप निराश झालो होतो", असं पृथ्वीनं सांगितलं.
"इंदौर येथे सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा खेळत असताना मला सर्दी आणि खोकला झाला होता. याबाबत मी वडिलांना माहिती दिली तेव्हा त्यांनी मला मेडिकलमधून कफ सिरप घ्यायला सांगितलं. मी फिजिओचा कोणताही सल्ला न घेता ते घेतलं. सलग दोन दिवस मी कफ सिरप घेत होतो आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा माझी डोपिंग चाचणी करण्यात आली तेव्हा प्रतिबंधित पदार्थांचा अंश माझ्या नमुन्यांमध्ये सापडला", अशी माहिती पृथ्वीनं दिली. पृथ्वीनं सांगितलं की त्याच्यासाठी तो काळ अत्यंत कठीण होता. त्याचं शब्दांत वर्णन करता येणार नाही. त्यावेळी मी माझ्या प्रतिमेवरुन खूप चिंतित झालो होतो. माझ्याबद्दल छापून येणाऱ्या प्रत्येक बातम्या मी तेव्हा वाचत होतो आणि विचार करत होतो की लोक आता माझ्याबद्दल काय विचार करत असतील. त्यानंतर मी लंडनला रवाना झालो आणि बरेच दिवस मी माझ्या खोलीत एकटाच राहिलो.
दरम्यान, या २१ वर्षीय खेळाडूनं या परिस्थितीवर मात करत स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केलं. आयपीएलमध्येही त्यानं चांगल्या धावा वसुल केल्या. आयपीएलमध्ये ८ सामन्यांमध्ये ३०८ धावा केल्या. त्यासोबत विजय हजारे करंडक स्पर्धेतही त्यानं चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेच्या एका सीझनमध्ये तब्बल ८०० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला.