Join us  

Prithvi Shaw Team India, IND vs SL: "किसी ने मुफ्त में पा लिया वो शख्स..."; संघातून डाववल्याने पृथ्वी शॉ नाराज, शायरीतून भावनांना करून दिली वाट

पृथ्वी शॉ सातत्याने डाववलं जात असल्याची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 4:10 PM

Open in App

Prithvi Shaw Team India, IND vs SL: बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या ३ टी२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी काल दिवशी भारतीय संघाची घोषणा केली आहे. शिवम मावी, मुकेश कुमार हे टी२० मालिकेसाठी टीम इंडियामध्ये नवीन चेहरे आहेत आणि पदार्पणाची तयारी करत आहेत. पण पुन्हा एकदा दोन्ही मालिकांसाठी मुंबईकर क्रिकेटपटू पृथ्वी शॉकडे दुर्लक्ष करण्यात आले. टी२० मालिकेसाठी त्याच्या नावाचा विचार करण्यात आला नाही किंवा वनडे मालिकेसाठीही निवडकर्त्यांनी त्याच्या नावाचा विचार केला नाही.

सातत्याने डावलले जात असल्यामुळे पृथ्वी शॉ पुन्हा एकदा नाराज झाल्याची चर्चा आहे. संघ जाहीर झाल्यानंतर पृथ्वी शॉ याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. या स्टोरीचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावला जात आहे. शॉने गेल्या वर्षी भारताकडून श्रीलंकेविरुद्ध टी२० सामना खेळला होता. त्या सामन्यानंतर तो टीम इंडियातून बाहेर आहे. तो पुनरागमनासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. युवा सलामीवीराने मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. IPL 2022 मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी १० सामन्यांमध्ये १५३ च्या स्ट्राइक रेटने २८३ धावा केल्या होत्या. परंतु भारतीय संघात त्याच्या पुनरागमनाचे दरवाजे अद्यापही बंदच आहेत.

श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाच्या घोषणेनंतर शॉ ने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक रील शेअर करून शायरी शेअर केली नि नाराजी व्यक्त केली. त्यांनी उझैर हिजाजीची कविता 'किसी ने मुफ्त में पा लिया वो शख्स, जो मुझे है हर कीमत पर चाहिये था' ही शायरी शेअर केली. सोशल मीडियावर पृथ्वी शॉ च्या या पोस्टवरून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. तो संघातील काही नवीन खेळाडूंना लक्ष्य करत असल्याचे काही युजर्सचे म्हणणे आहे.

दरम्यान, शॉ ने त्याचा प्रोफाईल फोटोही काढला आहे. शॉ ने केवळ शायरीच शेअर केलेली नाही, तर त्याने इन्स्टाग्रामवरून त्याचा प्रोफाईल फोटोही काढून टाकला आहे. भारत ३ जानेवारीपासून ३ टी२० आणि ३ वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी यजमानपद भूषवणार आहे. हार्दिक पांड्या सलग दुसऱ्यांदा टी-२० संघाचे नेतृत्व करणार आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये त्याने आपल्या नेतृत्वाखाली भारताला न्यूझीलंडवर विजय मिळवून दिला होता. त्याचबरोबर वन डे मालिकेत रोहित शर्मा कर्णधारपद भूषवणार आहे, तर पांड्या उपकर्णधारपद सांभाळणार आहे.

टॅग्स :पृथ्वी शॉभारत विरुद्ध श्रीलंकाबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ
Open in App