भारतीय संघातील प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याच्याकडे फॉर्माने पाठ फिरवल्याचे दिसतेय. क्रिकेटच्या मैदानाबाहेरील वादामुळेच तो जास्त चर्चेत राहत आहे. २०२० पासून कसोटी आणि २०२१ पासून वन डे संघातून बाहेर असलेला पृथ्वी भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतोय.. २०२१ मध्ये त्याने भारताकडून एकमेव ट्वेंटी-२० खेळली होती. पृथ्वीसोबत १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असलेला शुबमन गिलने भारतीय संघातील स्थान पक्के केलेले दिसतेय... पृथ्वीच्या मागून सीनियर संघात आलेला गिल चांगल्या फॉर्मात आहे. आता पृथ्वीला पुनरागमनासाठी चांगली टक्कर मिळणार हे नक्की आहे.
भारतीय संघातून मिळालेला डच्चू, पुनरागमनासाठीचे त्याचे प्रयत्न अन् सतत वादामुळे होणारी चर्चा, यावर पृथ्वी शॉने Cricbuzz ला दिलेल्या मुलाखतीत मन मोकळे केले. तो म्हणाला, मला जेव्हा भारतीय संघातून वगळले गेले, तेव्हा त्यामागचं कारण मला माहित नव्हते. माझं फिटनेस त्यामागचं कारण असल्याचं काही जणं म्हणाले. मी त्यानंतर NCA मध्ये आलो, धावा केल्या आणि पुन्हा ट्वेंटी-२० संघात परतलो. वेस्ट इंडिजविरुद्ध मला संधी नाही दिली गेली. मी त्याने निराश झालो, परंतु पुढे चालत राहायचं ठरवलं. मी काहीच करू शकत नाही, कोणाशी भांडू शकत नाही.''
आपण जास्त विचार करत नसल्याचेही यावेळी त्याने सांगितले. तो म्हणाला,''मी घराबाहेर पडत नाही, लोकं मला सतावतात. ते सोशल मीडियावर काही टाकतात, त्यापेक्षा सध्या मी घरातच राहणे पसंत करतो. बाहेर जाऊन तरी काय करू? जहाँ भी जाता, कुछ ना कुछ होता है! ( हसत) मी लंच आणि डिनरलाही एकटाच जातो, एकटा राहण्याचा मी आनंद लुटतोय.''