दुखापतीतून सावरताना न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पृथ्वी शॉ यानं रविवारी धडाकेबाज खेळी केली. रणजी करंडक स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करताना पृथ्वीला दुखापत झाली होती. त्यानंतर तो बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्तीसाठी गेला होता आणि तेथून तो भारत अ संघाच्या दौऱ्यासाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर पृथ्वीनं भारत अ संघाकडून दमदार दीडशतकी खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर भारत अ संघानं विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघानं 50 षटकांत 372 धावा चोपल्या. मयांक अग्रवाल ( 32), कर्णधार शुबमन गिल ( 24) आणि सूर्यकुमार यादव ( 26) हे माघारी परतल्यानंतरही पृथ्वीनं फटकेबाजी कायम राखली. त्याला विजय शंकरची चांगली साथ मिळाली. पृथ्वीनं 100 चेंडूंत 22 चौकार व 2 षटकार खेचून 150 धावा चोपल्या. शंकरने 41 चेंडूंत 6 चौकारांसह 58 धावा केल्या. कृणाल पांड्यानेही 32 धावांची खेळी केली.
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड एकादश संघानेही तुल्यबळ लढत दिली. जॅक बोयलेनं 130 चेंडूंत 17 चौकारांसह 130 धावा केल्या. त्याला फिन अॅलन ( 87), कर्णधार डॅरील मिचेल ( 41) आणि डॅन क्लेव्हर ( 44) यांची योग्य साथ लाभली. पण, भारत अ संघाच्या गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर त्यांना 6 बाद 360 धावाच करता आल्या. न्यूझीलंडला 12 धावांनी हा सामना गमवावा लागला.