नवी दिल्ली :भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने पुन्हा एकदा ताबडतोब फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. अलीकडेच पार पडलेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या आणि श्रीलंकेविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत संधी न मिळाल्याने त्याने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आज त्याने द्विशतकी खेळी करून निवड समितीला इशारा दिला आहे. सध्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि आसाम यांच्यात सामना खेळवला जात आहे.
रणजी ट्रॉफीत ठोकले झंझावाती द्विशतक
दरम्यान, आसामच्या संघाने नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पृथ्वी शॉ आणि मुशीर खान या सलामीवारांनी शानदार सुरूवात करून आसामवर दबाव टाकला. मात्र, मुशीर खान त्याच्या अर्धशतकाला मुकला आणि 42 धावांवर तंबूत परतला. पण पृथ्वीने 235 चेंडूचा सामना करून शानदार द्विशतक झळकावले. त्याला कर्णधार अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी करून शानदार साथ दिली. सध्या रहाणे आणि पृथ्वी यांची जोडी खेळपट्टीवर टिकून आहे. मुंबईच्या संघाची धावसंख्या 79 षटकांपर्यंत 2 बाद 357 एवढी झाली आहे. पृथ्वी 252 चेंडूत 218 धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे. लक्षणीय बाब म्हणजे पृथ्वी शॉने त्याच्या द्विशतकी खेळीत एकूण 31 चौकार आणि 1 षटकार मारला.
पृथ्वी शॉने वेधले लक्ष
पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रापर्यंत मुंबईची धावसंख्या 36 षटकांत 1 बाद 171 एवढी होती. मुख्तार हुसैन वगळता आसामच्या कोणत्याच गोलंदाजाला पहिल्या सत्रात यश मिळाले नाही. पृथ्वीने पहिल्या सत्राच्या अखेरीस शतक पूर्ण करून मुंबईला मजबूत स्थितीत नेले. खरं तर मुंबईचा संघ मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात रणजी ट्रॉफीच्या रिंगणात उतरला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Prithvi Shaw scored a 235-ball double century against Assam while playing for Mumbai in the Ranji Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.