नवी दिल्ली : भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने पुन्हा एकदा ताबडतोब फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. अलीकडेच पार पडलेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या आणि श्रीलंकेविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत संधी न मिळाल्याने त्याने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आज त्याने त्रिशतकी खेळी करून निवड समितीला इशारा दिला आहे. सध्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि आसाम यांच्यात सामना खेळवला जात आहे.
रणजी ट्रॉफीत ठोकले झंझावाती त्रिशतक दरम्यान, आसामच्या संघाने नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पृथ्वी शॉ आणि मुशीर खान या सलामीवारांनी शानदार सुरूवात करून आसामवर दबाव टाकला. मात्र, मुशीर खान त्याच्या अर्धशतकाला मुकला आणि 42 धावांवर तंबूत परतला. पण पृथ्वीने 326 चेंडूचा सामना करून शानदार त्रिशतक झळकावले. त्याला कर्णधार अजिंक्य रहाणेने शतकी खेळी करून शानदार साथ दिली. सध्या रहाणे आणि पृथ्वी यांची जोडी खेळपट्टीवर टिकून आहे. मुंबईच्या संघाची धावसंख्या 112 षटकांपर्यंत 2 बाद 515 एवढी झाली आहे. पृथ्वी 341 चेंडूत 316 धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे. लक्षणीय बाब म्हणजे पृथ्वी शॉने त्याच्या त्रिशतकी खेळीत एकूण 43 चौकार आणि 2 षटकार मारले. तर मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावून युवा खेळाडूला साथ दिली.
पृथ्वी शॉने वेधले लक्ष खरं तर पहिल्या दिवसाअखेर मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ नाबाद परतले होते. आज दुसऱ्या दिवसाची सुरूवात होताच रहाणेने आपले शतक तर पृथ्वीने त्रिशतक पूर्ण केले. मुख्तार हुसैन वगळता आसामच्या कोणत्याच गोलंदाजाला अद्याप यश मिळाले नाही. तर अरमान जाफरला धावबाद करण्यात आसामच्या संघाला यश आले. पृथ्वीने पहिल्या सत्राच्या अखेरीस शतक पूर्ण करून मुंबईला मजबूत स्थितीत नेले होते. खरं तर मुंबईचा संघ मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात रणजी ट्रॉफीच्या रिंगणात उतरला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"