- सौरव गांगुली लिहितात...
इंग्लंड क्रिकेटमधील शानदार खेळाडू अॅलिस्टर कुकसाठी ही निरोपाची कसोटी आहे. वेगवान खेळपट्ट्यांवर सलामीवीर म्हणून १२ हजारापेक्षा अधिक धावा फटकावणे मोठी उपलब्धी आहे. तो योग्यवेळी निवृत्ती स्वीकारत आहे. असा निरोप सर्वांना मिळत नाही. तो केवळ चांगला फलंदाजच नाही तर व्यक्ती म्हणूनही शानदार आहे.इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर भारतीय पाचव्या कसोटी सामन्यात विजयाने निरोप घेण्यास प्रयत्नशील राहील. मालिकेचा समारोप १-४ ने करण्याऐवजी २-३ ने करणे अधिक सन्मानजनक ठरेल.भारताला ज्या तीन कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला त्यात विजयाच्या संधीही मिळाल्या होत्या, पण संधी मिळणे आणि प्रत्यक्ष निकाल यात बराच फरक असतो, याची कल्पना भारतीय खेळाडूंना नक्कीच आली असेल.विराट सेनेला ओव्हलवरील कडव्या आठवणी विसरुन खेळावे लागेल. त्यांच्याकडे गमावण्यासारखे काही नाही. मालिका गमावल्यानंतर टीकेची झोड उठली. व्यावसायिक खेळाचा हा एक भाग आहे. खेळाडूंनी स्वत:च आत्मपरीक्षण करीत आगेकूच करण्याबाबत विचार करणे सर्वांत महत्त्वाचे आहे. सर्व खेळाडूंनी पराभवाचे कारण आणि वैयक्तिक कामगिरीचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे, पण विराटला स्वत: याबाबतीत अधिक जवळून नजर ठेवण्याची गरज आहे. मी मुद्दाम ‘स्वत:’ या शब्दाचा वापर केला आहे. कारण त्यामुळे त्याला सर्वोत्तम अंतिम ११ खेळाडूंची निवड करता येईल. अश्विनच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित करता येणार नाही. अश्विन पूर्णपणे फिट आहे किंवा नाही, हे विराटला बघावे लागेल व त्यानंतर अश्विन व जडेजाचा निर्णय घ्यावा लागेल. ओव्हल खेळपट्टीवर अधिक उसळी राहील. विराटला सामन्यादरम्यान तयार होणाऱ्या रफ पॅचचाही विचार करावा लागेल.विराटला फलंदाजीवर अधिक लक्ष द्यावे लागेल. माझ्यामते सलामी जोडीत बदल करताना पृथ्वी शॉला संधी द्यायला हवी. तो युवा असून भारत ‘अ’च्या इंग्लंड दौ-यात चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरला होता. राहुल व शिखर धवन हे फॉर्मात नाहीत. मी पाच गोलंदाजांसह खेळण्याचे समर्थन करतो. मालिकेत भारतीय गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. दरम्यान, विराटकडे चार गोलंदाजांच्या थेअरीचा पर्याय आहे. त्यामुळे भविष्यात रणनीती ठरविताना मदत मिळेल. या थेअरीचा वापर करीत अनेक संघ यशस्वी ठरले आहेत. त्याचसोबत हनुमा विहारीलाही संधी मिळू शकते.