Prithvi Shaw Team India: जुलै 2021 पासून भारतीय संघातून बाहेर असलेला स्टार युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 23 वर्षीय पृथ्वीने नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफी 2022-23 मध्ये एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने आसामविरुद्ध 379 धावांची इनिंग खेळून बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनाही चोख प्रत्युत्तर दिले आहे. या सामन्यात पृथ्वी शॉने 383 चेंडूत 379 धावा केल्या. यात त्याने 4 षटकार आणि 49 चौकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेटही 98.96 होता. या इनिंगपासून पृथ्वी शॉ सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आला आहे.
भारतीय संघात का मिळत नाही संधी?पृथ्वी शॉ जुलै 2021 पासून भारतीय संघासाठी एकही सामना खेळलेला नाही. श्रीलंकेविरुद्ध सध्या सुरू असलेल्या मालिकेसाठीही त्याची निवड झाली नव्हती. अशा परिस्थितीत युजर्सनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे की, इतकी चांगली कामगिरी करुनही पृथ्वी शॉला भारतीय संघात संधी का मिळत नाही? तर, पृथ्वी शॉच्या मागील 10 सामन्यांतील आकडेवारीवरुन चाहत्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल. आसामविरुद्ध झालेल्या सामन्याच्या आधी झालेल्या 10 सामन्यांमध्ये पृथ्वी कोणतीही जादू दाखवू शकला नाही.
13 डावातील कामगिरी निवडीला अयोग्यदेशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळल्या गेलेल्या या शेवटच्या 10 सामन्यांच्या 13 डावांमध्ये त्याने केवळ 351 धावा केल्या. म्हणजेच पृथ्वीने एकूण 13 डावात केलेल्या धावा आसामविरुद्ध एका डावात केलेल्या 379 धावांपेक्षाही कमी आहेत. गेल्या 13 डावांमध्ये पृथ्वी शॉला एकही शतक झळकावता आले नाही. यादरम्यान त्याने केवळ 3 अर्धशतक केले. ही कामगिरी टीम इंडियात निवडीसाठी अजिबात चांगली नव्हती, हे चाहत्यांनी समजून घ्यायला हवे.
इशान आणि शुभमनशी थेट स्पर्धाभारतीय संघात वनडेसाठी अनेक दावेदार आहेत. सलामीला पृथ्वी शॉची थेट लढत शुभमन गिल आणि ईशान किशनशी होणार आहे. ईशानने बांगलादेशविरुद्धच्या वनडेत द्विशतक झळकावले. असे असतानाही श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात त्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळू शकले नाही. अशा स्थितीत पृथ्वी शॉचा नंबर थोडा दूरचा वाटतो.
कोहली-पांड्या-राहुल सपोर्ट का नाही?आता काहीजण म्हणतील की केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हार्दिक पांड्या आणि विराट कोहली सारख्या खेळाडूंना खराब कामगिरीनंतरही संधी मिळू शकते, तर पृथ्वी शॉला का नाही? तर, राहुल, पांड्या आणि कोहली यांची स्वतःची खासियत आहे. हे तिघे फॉर्मात असताना त्यांच्यात एकतर्फी सामने जिंकण्याची क्षमता आहे. यामध्ये कोहली, पांड्या आणि पुजाराने आपली लय साधत टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. केएल राहुल याला अपवाद ठरू शकतो. 23 वर्षीय पृथ्वी शॉच्या समोर संपूर्ण कारकीर्द आहे, त्यामुळे भविष्यात त्यालाही संधी नक्कीच मिळेल.