delhi capitals team | नवी दिल्ली : आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. यंदाच्या हंगामातील सुरूवातीचे ५ सामने दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे होते. शनिवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (DC vs RCB) दिल्ली कॅपिटल्सचा दारूण पराभव केला. खरं तर डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नेतृत्वातील दिल्लीचा या स्पर्धेत सलग पाचवा पराभव झाला आहे. २०२० मध्ये आयपीएलचा फायनलचा सामना खेळणारा दिल्लीचा संघ सध्या विजयाच्या शोधात आहे. संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर सातत्याने धावा करत असला तरी त्याच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw ipl) देखील धावांसाठी संघर्ष करत आहे. फलंदाजीत सातत्याने अपयशी ठरलेला पृथ्वी शॉ सराव सत्रात गोलंदाजी करताना दिसला, ज्याचा व्हिडीओ फ्रँचायझीने शेअर केला आहे.
दरम्यान, पृथ्वी शॉ फिरकी गोलंदाजी करताना माजी दिग्गज फिरकीपटूंची कॉपी करत असल्याचे दिसते आहे. दिल्ली कॅपिटल्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पृथ्वी शॉ माजी फिरकीपटू हरभजन सिंगसारखी गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. यानंतर त्याने श्रीलंकेचा दिग्गज मुथय्या मुरलीधरनच्या अंदाजात गोलंदाजी केली. सर्वात शेवटी पृथ्वीने ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नच्या ॲक्शनमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओच्या शेवटी शॉ सांगतो की, त्याने मुरलीधरनच्या गोलंदाजीची ॲक्शन सर्वात चांगली केली.
आयपीएलच्या चालू हंगामात पृथ्वी शॉची बॅट शांत आहे. त्याला आतापर्यंत खेळलेल्या पाचही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली पण काही खास कामगिरी करता आली नाही. पाच सामन्यांत त्याने केवळ ३४ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ अद्याप आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे.
दिल्लीचा सलग पाचवा पराभवआयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दिल्लीचा पाचवा सामना आरसीबीसोबत झाला. खरं तर या हंगामात दिल्ली कॅपिटल्सला सलग पाच सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. आरसीबीने २३ धावांनी विजय मिळवून दिल्लीला आणखी एक धक्का दिला. आता दिल्लीचा पुढीला सामना २० एप्रिल रोजी कोलकात नाईट रायडर्सविरूद्ध होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"