भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याची कार समजून त्याच्या मित्राच्या कारवर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पृथ्वी शॉ याने दुसऱ्यांदा सेल्फी देण्यास नकार दिल्याने काही जणांनी त्याचा राग मनात धरून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र सुदैवाने हा हल्ला करण्यात आला तेव्हा पृथ्वी शॉ त्या कारमध्ये नव्हता.
संबंधित कारमध्ये पृथ्वी शॉ असल्याचा समज करून घेऊन आरोपींनी आशिष यादव यांच्या कारवर हल्ला केला. याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पृथ्वी शॉ सहारा स्टार हॉटेल मुंबई येथे असताना आरोपी सना गिल आणि शोबित ठाकूर क्रिकेटपटू पृथ्वी शॉकडे सेल्फी घेण्यासाठी पोहोचले. आशिष यादवने याबाबत पोलिसांना सांगितले की, दोन्ही आरोपींनी पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेतली. त्यानंतर दोघांनीही पुन्हा एकदा सेल्फी घेणयासाठी पृथ्वीला सोबत येण्यास सांगितले. मात्र त्याने नकार दिला. त्यानंतर हॉटेलच्या मॅनेजरने या दोघांनाही बाहेर काढले. या घटनेमुळे हे दोन्ही आरोपी संतप्त झाले. त्यांनी हॉटेलमधून बाहेर पडलेल्या पृथ्वी शॉच्या कारचा पाठलाग सुरू केला.
पृथ्वी शॉची कार जोगेश्वरी लिंक रोडवरील पेट्रोल पंपावर आली असताना आरोपींनी ही कार समोरून अडवली. त्यानंतर बेसबॉलच्या बॅटने कारच्या काचा फोडल्या. मात्र सुदैवाने पृथ्वी शॉ त्या कारमध्ये नव्हता. त्या कारमधून पृथ्वी शॉचा मित्र आशिष यादव, ड्रायव्हर आणि आणखी एक व्यक्ती प्रवास करत होती. तर पृथ्वी शॉ अन्य कारने निघून गेला होता. दरम्यान, गाडीची काच तुटल्यानंतर आम्ही पाहिले की, एक पांढरी कार आणि तीन बाईक आमचा पाठलाग करत होत्या, असे आशीष यादवने सांगितले.
दरम्यान, हे प्रकरण दाबायचे असल्यास ५० हजार रुपये दे, अन्यथा एखाद्या खोट्या केसमध्ये तुम्हाला अडकवू, अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे पृथ्वी शॉच्या मित्रांनी सांगितले. त्यानंतर पृथ्वीचा मित्र काचा फुटलेल्या कारसह ओशिवरा पोलीस ठाण्यात आला. तिथे पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून सना गिल आणि शोबित ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी आयपीसी कलम ३८४, १४३, १४८, १४९, ४२७. ५०४ आमि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.