मुंबई : युवा सलामीवीर आणि कर्णधार पृथ्वी शॉ याने झळकावलेल्या तडाखेबंद नाबाद द्विशतकाच्या जोरावर मुंबईने विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळविताना पदुच्चेरीचा तब्बल २३३ धावांनी फडशा पाडला. पृथ्वीने १५२ चेंडूंत ३१ चौकार आणि ५ षट्कारांचा पाऊस पाडत नाबाद २२७ धावांचा तडाखा दिला. या जोरावर मुंबईने ५० षटकांत ४ बाद ४५७ धावांचा एव्हरेस्ट उभारला. यानंतर पदुच्चेरीचा डाव ३८.१ षटकांत २२४ धावांत संपुष्टात आला. मुंबई संघातून पदार्पण करणाऱ्या प्रशांत सोळंकी यानेही छाप पाडत पदुच्चेरीचा अर्धा संघ बाद केला.
जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर नाणेफेक जिंकून पदुच्चेरीने मुंबईला फलंदाजीस निमंत्रित केले. मात्र, श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत मुंबईचे नेतृत्व करणाऱ्या पृथ्वीने त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवताना जबरदस्त फटकेबाजी केली. पृथ्वीला साथ दिली ती सूर्यकुमार यादवने. सूर्यानेही वाहत्या गंगेत हात धुऊन घेताना ५८ चेंडूंत २२ चौकार व ४ षट्कारांसह १३३ धावा कुटल्या. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी २०१ धावांची भागीदारी केली.
अनुभवी आदित्य तरेनेही ६४ चेंडूंत ५६ धावा काढताना पृथ्वीला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला.यानंतर पदुच्चेरीचा डाव २२४ धावांत गुंडाळत मुंबईने दणदणीत विजय मिळवला. युवा लेगस्पिनर प्रशांत सोळंकी याने ४८ चेंडूंत ५ बळी घेत पदुच्चेरीच्या डावाला खिंडार पाडले. शार्दुल ठाकूर आणि तुषार देशपांडे यांनीही प्रत्येकी २ बळी घेतले. पदुच्चेरीकडून कर्णधार दामोदरन रोहित याने ६८ चेंडूंत ६३ धावा करत एकाकी झुंज दिली.
महत्त्वाचे :
- विजय हजारे चषक स्पर्धेत मुंबईने सर्वाधिक धावसंख्या रचली.
- पृथ्वीने स्पर्धेतील संजू सॅमसनचा सर्वोच्च नाबाद २१२ धावांचा विक्रम मोडला.
- लिस्ट ए क्रिकेटमध्ये पृथ्वीचे पहिले द्विशतक.
- यंदाच्या स्पर्धेत पृथ्वीने दुसऱ्यांदा शतकी खेळी केली.
- लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रम अली ब्राऊन (२६८) यांच्या नावावर आहे.
- लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पृथ्वी आठवा भारतीय.
- विजय हजारे चषक स्पर्धेतील हे एकूण चौथे द्विशतक ठरले.
Web Title: Prithvi Shaw's double century as soon as he was out of the team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.